Advertisement

जादा दराने खत विक्री , म्हसवड पोलीसात खत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल.

म्हसवड (वार्ताहर)-
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित युरिया खताची ज्यादा दराने विक्री व इतर खतांची बेकायदेशीर विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
कृषी अधिकारी श्रीमती शितल रामचंद्र घाडगे वय 28 वर्षे, व्यवसाय- नोकरी, पदनाम- कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) तालुका कृषीअधिकारी दहिवडी रा. तुपेवाडी रोड दहिवडी ता.माण जि.सातारा पथकाने धाड टाकून जादा दराने युरीया विक्री करणाऱ्या विक्रेते यावर म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

म्हसवड ता.माण गावचे हद्दीत मे.बाप्पा.कृषी सेवा केंद्र म्हसवड ता.माण या ठिकाणी चौकशी व तपासणी करणे कामे जिल्हास्तरीय भरारी पथक सातारा अध्यक्ष श्री. गजानन ननावरे ,कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सातारा व श्री.संजय फरतडे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सातारा यांची समवेत गेलो होतो. तेव्हा दुकानदार मध्ये दुकान मालक मंगेश अशोक सावंत रा. म्हसवड ता.माण जि.सातारा, कामगार-रोहन खांडेकर हे व खत खरेदी करणेकरिता आलेले शेतकरी उपस्थित होते. तेव्हा आमचे समक्ष युरिया खताची 300/- रुपये प्रती गोणी प्रमाणे विक्री व त्यासोबत इतर निवीष्ठांचे लिंकींग होत असल्याचे निदर्शनास आले.
तसेच त्यांचेकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसलेने शेतक-यांना दिला जाणारा अनुदानित युरिया खताची ज्यादा दराने विक्री व त्यासोबत इतर खतांची लिंकींगद्वारे विक्री करुन शेतकरी व शासनाची फसवणुक केल्याने माझी मंगेश अशोक सावंत रा. म्हसवड ता.माण जि.सातारा यांचे विरुद्ध तक्रार आहे अशी तक्रार दाखल केली आहे.
यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एन एन पळे अधिक तपास करत आहेत.
…..

कळंबी ग्रामपंचायत येथे गाव कारभार सांभाळत आहेत महिला

सातारा प्रतिनिधी
(आधिकराव सावंत)-

कळंबी या ग्रामपंचायतीचा कारभार महिला चालवतात, विशेष बाब म्हणजे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, गावगामकार तलाठी या पदावर महिला कार्यरत आहेत.

कळंबी ग्रामपंचायत , महिला,सरपंच ,सौ, मिनाज अमीर मुलानी, महिला,उपसरपंच सौ, सुनिता संतोष सुर्यवंशी , ग्रामसेवक, महिला,सौ, एस,एस,देटके व आज ग्रामपंचायत कळंबी महसूल ,नवनियुक्त तलाठी, महिला,सौ, ऐश्वर्या कांबळे, ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सौ, कांबळे मॅडम यानी आज पदभार स्वीकारला ग्रामपंचायत कळंबी सर्व पदाधिकारी महिला गावचा कारभार सांभाळत आहेत याचे सर्वत्र कौतुक होत आहे,कळंबी, ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले , उपस्थित ग्रामस्थ ,माझी उपसरपंच सतिश काळे, सचिन घाडगे,मोहन घाडगे (तात्या),बाबासो फडतरे, भीमराव ढोले, मधुकर काळे, अमीर मुलानी,जगन्नाथ देशमुख, दिलीप घाडगे,रामचंद्र घाडगे, कळंबी,ग्रामस्थ उपस्थित होते

बापुराव थोरात मायणी येथून हरवले

मायणी प्रतिनिधी—
मायणी तालुका खटाव येथील बागायतदार शेतकरी तानाजी दत्तू थोरात वय 65 हे मायणी लक्ष्मी नगर येथून गायब झाले आहेत या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे याबाबत मायणी पोलीस स्टेशनला हरवलेबद्दल गुन्हा नोंद झाला आहे तरी कोणास दिसल्यास बापूराव थोरात यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही मायणी पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी केले आहे.

पत्रकार रमेश आढाव यांचे दुःखद निधन

फलटण वार्ताहर
प्रा.रमेश आढाव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुका अध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव वय 63 यांचे नागपूर येथे गुरुवारी रात्री हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले आहे.

   त्यांचे पार्थिव शनिवार दि.19 रोजी सकाळी 7 वाजता गुणवरे ग्रामपंचायत येथे अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तेथूनच अंत्ययात्रा निघेल त्यानंतर गुणवरे येथील त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकारांच्या वतीने सराना भावपुर्ण श्रद्धांजली

दि १९ रोजी वडूज येथे जागृत ग्राहक राजाचा विभागीय अभ्यास वर्ग.


वडूज, दि 17 ( प्रतिनिधी )
ग्राहक चळवळीतील अग्रणी असलेल्या जागृत ग्राहक राजा संस्थेच्या वतीने दि १९ जुलै रोजी अंबिका हॉल, कुरोली रोड, वडूज येथे एक दिवसीय विभागीय कार्यकर्ता अभ्यास वर्ग आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप पाटील, संघटक दिलीप फडके व सचिव नागनाथ स्वामी यांनी दिली.
या वर्गात सातारा, पुणे व सांगली व पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते व राज्य संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.या वर्गास दिलीप निंबाळकर, बाळासाहेब घुगरे, सौ साधना पाटील यांचेसह राज्य पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक.

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पदाधिकाऱ्यांसोबत अधिस्वीकृती संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये १००% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर ८,००० किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी असे मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले. यामुळे पत्रकारांना जिल्हा व तालुका पातळीवर देखील सेवा देता येईल.
….

भाजपच्या माध्यमातून भादे गटात विकासकामे मार्गी लावणार- मा.आनंदराव शेळके-पाटील

लोणंद (प्रतिनिधी -)–
(मा.सभापती, समाजकल्याण समिती सातारा)
राजकीय कारकिर्दीत पंचायत समिती, जिल्हा परिषदेत जनतेने संधी दिल्यापासून आत्तापर्यंत मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे, यापुढेदेखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भादे जिल्हा परिषद गटात सर्वांगीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण समितीचे माजी सभापती मा.आनंदराव शेळके-पाटील यांनी केले.
खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या निधीतून कराडवाडी येथील वाघोशी रस्ता ते कोळेकर घर कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ वेळी शेळके-पाटील बोलत होते.
यावेळी जेष्ठ नेते शरदकाका देशपांडे, खंडाळा पुर्व मंडल अध्यक्ष देविदास चव्हाण, भापजा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके-पाटील, कार्यकारिणी सदस्य अनिल कुदळे, गोरख धायगुडे, नारायण ठोंबरे, बापूसाहेब खोपडे, प्रकाश कराडे, दिलीप कराडे, शरद कराडे, मल्हारराव कराडे, कुंडलिक ठोंबरे, विठ्ठल केसकर, विकास ननवरे, पोलीस पाटील शुभांगी कराडे, दिपाली कराडे, ग्रामसेवक राऊत उपस्थित होते.
यापुढील काळात असाच विकास होणेसाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे रहावे अशी अपेक्षा शेळके-पाटील यांनी केली.
भादे जिल्हा परिषद गटातील नागरिकांची विकासकामे, मूलभूत गरजा या महत्वकांशी मानून त्या प्रामुख्याने सोडवल्या जातील असा विश्वास भाजप जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी दिला.
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून देऊ अशी ग्वाही सरपंच शरद कराडे यांनी यावेळी दिली.
स्वागत गोरख कराडे यांनी केले व आभार रामभाऊ कराडे यांनी मानले.

मूकबधिर विद्यालयास प्रोजेक्टर भेट !

अनिल वीर
सातारा : येथील समता प्रसारक मंडळ संचालित मूकबधिर विद्यालय येथे सागर दिलीप कांबळे यांनी त्यांच्या पहिल्या पगारातून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर भेट दिला आहे.
विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन व्हावे. विज्ञानातील संकल्पना सोप्या व स्पष्ट होण्यासाठी या प्रोजेक्टरचा उपयोग होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता जगताप यांनी सागर कांबळे यांचे
विद्यार्थ्यांनी तयार केलेले गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.किरण जगताप यांनी प्रास्ताविकपर सागर कांबळे यांची शिक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट केली.सागर कांबळे यांनी या उपकरणाचे फायदे समजावून सांगितले व प्रात्यक्षिक करून दाखविले.सदरच्या कार्यक्रमास शिक्षक,कर्मचारी व अध्यानार्थी उपस्थीत होते.सुरेश जगताप यांनी आभार मानले.

फोटो : सागर कांबळे यांचा सत्कार करताना मुख्याध्यापिका हेमलता जगताप शेजारी मान्यवर व अध्यानार्थी.(छाया-अनिल वीर)

म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर सुनील पोरे यांच्या पाठपुराव्यामुळे दिवड- म्हसवड रस्त्याचे काम सुरू

म्हसवड वार्ताहर
म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर सुनील पोरे यांच्या पाठपुराव्यामुळे दिवड म्हसवड रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नवी दिल्ली, नागपूर, म्हसवड – दीर्घ पाठपुरावा आणि लोकहितासाठी अखंड प्रयत्न करणारे इंजि. सुनील पोरे यांच्या पुढाकाराला अखेर यश मिळाले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये दिल्ली येथे ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन, म्हसवड परिसरातील जनतेसाठी अत्यंत महत्वाचा असलेला सातारा-पंढरपूर मार्ग तत्काळ पूर्ण करावा, यासाठी इंजि. पोरे यांनी आमरण उपोषण केले होते. त्यानंतर या रस्त्याचे मुख्य काम मार्गी लागले, मात्र काही ठिकाणी अपूर्ण असलेली पूल व मोऱ्यांची कामे न संपल्याने नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

या गंभीर बाबीकडे एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कामे पूर्ण झाली नाहीत.

त्यामुळे परिस्थितीचा गांभीर्य ओळखून, ३१ मे रोजी नागपूर येथे पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, अपूर्ण असलेल्या पुल व मोऱ्यांची कामे तत्काळ पूर्ण करण्याची ठाम मागणी इंजि. सुनील पोरे व त्यांच्या शिष्टमंडळाने केली. यावर मंत्री गडकरी यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले.
त्याचाच परिणाम म्हणून आज म्हसवड व दिवड येथील अपूर्ण पुलांच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून देणाऱ्या इंजि. सुनील पोरे यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सातारा-पंढरपूर मार्ग परिसरातील प्रवाशांसाठी, शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी ही विकासाची महत्त्वाची पायरी ठरणार आहे, असा विश्वासही नागरिक व्यक्त करत आहेत.

उत्तम योजनांचा फक्त गाजावाजा; बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची फसवणूक


मुरुम, ता. उमरगा, ता. १६ (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ देण्यासाठी अनेक चांगल्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. रहिवाशी दाखले, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड, सात-बारा उतारे, फेरफार नोंदी, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी विविध सवलती या सर्व योजना समाजहिताच्या आणि खरंच उपयुक्त आहेत. परंतु या चांगल्या योजनांच्या अंमलबजावणीत मुरुम येथील प्रशासनाने अक्षरशः नागरिकांची थट्टा केली आहे. शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित शिबिरात बुधवारी (ता. १६) रोजी नायब तहसीलदार भीमाशंकर बेरूळे, मंडळ अधिकारी सुहास जेवळीकर, मुरुम मंडळ अधिकारी वैजनाथ माटे, तलाठी सुरेश खरात आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्कार, भाषणे आणि फोटोसेशनवर भर दिला गेला. नागरिकांनी मोठ्या आशेने गर्दी केली होती, मात्र प्रत्यक्षात फक्त आधार सीडिंग या एका कामापुरतेच शिबिर मर्यादित राहिले. तेही केवळ अर्ध्या तासात तांत्रिक अडचणी सांगून बंद करण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करून केवळ एका तासात शिबिर संपल्याची घोषणा करण्यात आली आणि नागरिकांना अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अनेक नागरिकांचे अर्ज, दाखले, फेरफार नोंदी आणि इतर तक्रारी हाताळल्या देखील गेल्या नाहीत. उपस्थित पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सर्व काही व्यर्थ ठरले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या सगळ्यावर तहसीलदारांना कोणतीच माहिती नसल्याचे समजले आणि कार्यक्रमाबाबत मोघम उत्तरे देऊन जबाबदारी झटकली. नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, जर योजना राबवायच्या नसतील, तर अशा शिबिरांमुळे आम्ही का फसावयाचे ? काहींनी प्रशासनाच्या फोटोसेशनवर प्रश्न उपस्थित केला. हे फोटो केवळ कागदावर यश दाखवण्यासाठी वापरणार का ? यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. तहसीलदार व संबंधित अधिकारी आता हे शिबिर योग्य नियोजन करून, पारदर्शकतेने पुन्हा राबवतील का ? की यावरही पडदा टाकून, गप्प बसतील ? या ढोंगी अंमलबजावणीमुळे शासनाच्या उत्तम योजनांवर लोकांचा विश्वास उडत चालला आहे, हे दुर्दैवी वास्तव ! आता तरी प्रशासनाला जाग येईल का, की पुन्हा एकदा नागरिकांना फसवण्याचा कट रचला जाणार ?

error: Content is protected !!