दहिवडी (एकनाथ वाघमोडे)



माण तालुक्यातील मलवडीहून दहिवडीच्या दिशेने जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि. २७) सायंकाळी सुमारास सहा वाजता आंधळी परिसरातील नायरा पेट्रोल पंपाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
दुचाकी क्रमांक एमएच ११-सीएफ-८२३९ ही भरधाव वेगाने जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर आदळली. या जोरदार धडकेत चैतन्य दादासो चव्हाण (वय २६, रा. बोथे, ता. माण) आणि आकाश सुरेश लवंगनारे (वय ३०, रा. राजापूर, ता. खटाव) हे दोघे जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच आंधळी गावचे पोलीस पाटील विशाल गुरव तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ पोलिस आणि रुग्णवाहिकेला संपर्क साधून मदतकार्य सुरू केले. दरम्यान, दहिवडी उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत, तसेच सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
जखमींना तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले; मात्र उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. अपघात इतका भीषण होता की दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली होती.
प्राथमिक तपासानुसार, भरधाव वेगामुळे आणि नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
या घटनेमुळे बोथे व राजापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.