दोन तोळे सोन्याचा अर्ध्या तासात लावला छडा

दहिवडी प्रतिनिधी,
दहिवडी (ता. माण)येथील राहणाऱ्या महिला जास्मिन निसार इनामदार या आज गुरुवार दि.९ रोजी दहिवडी बाजारात खरेदीसाठी गेल्या असताना त्यांच्या गळ्यात असलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र गळ्यातील स्कार्फ काढताना पडले होते. सदर महिला या बारामती येथे परत जात असताना पांगरी जवळ गेल्यानंतर त्यांना त्यांच्या गळ्यात त्यांचे मंगळसूत्र नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ याबाबत त्यांचा मुलास कळवले. सदर मुलगा दहिवडी पोलीस ठाण्यात गेला व त्यांने घडलेल्या प्रकाराबाबत सपोनि.अक्षय सोनवणे यांना माहिती दिली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस हवालदार गाढवे यांनी मंगळसूत्र पडलेल्या घटनेच्या अनुषंगाने दहिवडी बाजारपेठ व इतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामकाज चालू केले. त्यावेळी एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये अज्ञात महिलेला मंगळसूत्र दिसल्यानंतर त्यांनी ते उचलून घेतल्याचे अस्पष्टपणे दिसत होते.
त्यामुळे पुन्हा या व्यक्तीच्या मागावर जाऊन दहिवडी परिसरातील 15 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या व्यक्तीला शोधून काढले व त्यांना मंगळसूत्र बाबत विचारणा केली असता त्यांना मंगळसूत्र रस्त्यावर सापडल्याचे त्यांनी कबूल केले व ते मंगळसूत्र ते पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी जाणार होत्या असे देखील सांगितले. त्यामुळे मंगळसूत्र ताब्यात घेऊन ज्यांचे मंगळसूत्र होते त्यांना अवघ्या अर्ध्या तासात मंगळसूत्र परत देण्यात यश आले आहे. सदर महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र अर्ध्या तासात शोधून दिल्यामुळे दहिवडी पोलिसांबद्दल नागरिकांमधून कौतुक होतं आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस हवालदार रामचंद्र गाढवे यांनी केली आहे.
फोटो…….
दहिवडी : हरवलेले दोन तोळे सोने महिलेला परत करताना सपोनि.अक्षय सोनवणे व हवालदार रामचंद्र गाढवे.

