सातारा ता,५(प्रतिनिधी) अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी वाई पोलीस ठाण्यात चक्क २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. सातारा लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या सापळा कारवाईन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व हवालदार यांची खाबूगिरी चव्हाट्यावर आली. सातारा जिल्ह्यात वैविध्यपूर्ण कारवाई करून पोलीस दलाची मान राज्यात उंचावली असल्याचे एका बाजूला चित्र असताना दुसऱ्या बाजूला दक्षिण काशी म्हणून नावलौकिक प्राप्त वाईत अत्याचारासारखा गंभीर गुन्हा दाखल न करण्यासाठी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली जाते. ही दुर्दैवी बाब धक्कादायक रित्या समोर आली. यामुळे संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली तसेच लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईने त्या संबधित पोलीसांच्या खाबूगीरीची लक्तरे वेशीवर टांगली गेली. अत्याचार झाला त्याचं पुढं काय होणार ? याबातच्या चर्चा संपूर्ण दक्षिण काशी मध्ये सुरू झाल्या. गुन्हा दाखल न करण्यासाठी वाई सोबत अन्यत्र सुरू असलेल्या खाबूगिरीला यापुढे चाप बसणार का? असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
वाई पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक व हवालदार यांनी चक्क २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली. १५ हजार रुपये स्वीकारताना सापळा कारवाईत दोघांना रंगेहात पकडण्यात आले. संशयित बिपीन बाळकृष्ण चव्हाण पोलीस उपनिरीक्षक,संशयित उमेश दत्तात्रय गहीण पोलीस हवालदार यांना याप्रकरणी ताब्यात घेतलं असून. लाच लुचपत प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
सातारा लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे वाई पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी केली असल्याची तक्रार प्राप्त झाली. तक्रारीच्या पडताळणीमध्ये तक्रारदारास शिवीगाळ दमदाटी करून हाताने चापटी मारून अटक करण्याची भिती दाखवून लाच मागणीस प्रोत्साहन दिले. असल्याची बाब समोर आली. तक्रारदार यांनी लाच मागणीस होकार दर्शवताच त्यास सांगेल तेव्हा साक्षीदार व्हायचं असे बोलून लाच मागणीस प्रोत्साहन दिले असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाने माध्यमांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली.
सातारा लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी पथकातील पोलीस हवालदार नितीन गोगावले. गणेश ताटे,निलेश राजपुरे यांच्यासह वाई पोलीस ठाणे हद्दीत सापळा कारवाई केली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक व हवालदार १५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले. त्याना चौकशी कामी ताब्यात घेत त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंध अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सातारा लाच लुचपत प्रतिबंधचे उपअधीक्षक राजेश वाघमारे व टीमचे या करवाईबद्दल अभिनंदन होत आहे.
२० हजारांची लाच घेताना उपनिरीक्षक व हवालदार जाळ्यात.