म्हसवड | प्रतिनिधी
माणगांगा पॅरामेडिकल कॉलेज, मासाळवाडी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्वागत समारंभ संपन्न
म्हसवड येथील माणगांगा पॅरामेडिकल कॉलेज, मासाळवाडी येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या डीएमएलटी (DMLT) व रेडिओलॉजी टेक्निशियन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्वागत समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिखर शिंगणापूरचे नवनिर्वाचित उपसरपंच डॉ. अतुल बंदुके, तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. वसंत मासाळ उपस्थित होते. विशेष मार्गदर्शक म्हणून ए.पी.आय. अक्षय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना यशासाठी चिकाटी, जिद्द आणि मेहनतीची गरज पटवून दिली.
ए.पी.आय. सोनवणे साहेब म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य दिशा व परिश्रम घेतल्यास निश्चितच यशस्वी होऊ शकतात. आजच्या युगात डीएमएलटी व रेडिओलॉजिस्ट सारख्या कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या आहेत.”
कार्यक्रमात बोलताना डॉ. अतुल बंदुके म्हणाले की, “ही संस्था ग्रामीण भागात मोठ्या संघर्षातून उभी राहिली आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. वसंत मासाळ हे संत गाडगेबाबांच्या विचारांचे अनुयायी आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि समाजाभिमुख दृष्टिकोनामुळेच आज ही संस्था जिल्ह्यात मानाचं स्थान मिळवते आहे.”
संस्थेचे अध्यक्ष डॉ. वसंत मासाळ यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “सन 2013 पासून आजपर्यंत हजारो विद्यार्थी या संस्थेतून घडले असून आज ते स्वबळावर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. हेच आमचं यश आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष बगाडे सर यांनी करताना यशस्वी माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा उलगडली. यावेळी सन 2024-25 च्या बोर्ड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली:
डीएमएलटी (DMLT) विभागात:
प्रथम: कु. सानिका शिंदे – 84%
द्वितीय: अविनाश पुकळे – 82%
तृतीय: कु. प्रेरणा बुधवाले – 80%
चतुर्थ: कु. प्रतीक्षा बुधवाले – 79%
पंचम: कु. पायल विरकर – 78%
रेडिओलॉजि टेक्निशियन विभागात:
प्रथम: सुरज माने – 86%
द्वितीय: प्रेम तोरणे – 85%
तृतीय: सुमित सावंत – 83%
