धाराशिव वृत्तसेवा
धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने कर्जबाजारी झालेल्या एका २९ वर्षीय तरुणाने आपली पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

लक्ष्मण मारुती जाधव (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण हा गावात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तीन वर्षांपूर्वी त्याने गावातील तेजस्विनी (वय २१) हिच्याशी प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला दोन वर्षांचा मुलगा होता. सुखी संसारात सर्व काही सुरळीत चालले असताना, लक्ष्मणला ऑनलाइन रम्मी खेळण्याचे व्यसन लागले. या व्यसनाने त्याला कर्जाच्या खाईत लोटले आणि यातूनच जाधव कुटुंबाच्या विनाशाची सुरुवात झाली.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रम्मीच्या नादात लक्ष्मणवर मोठा कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने आपली वडिलोपार्जित एक एकर जमीन आणि गावातील एक भूखंड विकला. तरीही कर्जाचा बोजा कमी होत नव्हता. सततच्या आर्थिक संकटामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. रविवारी (दि. १५ जून) रात्री याच तणावातून लक्ष्मणने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, त्याने पत्नी तेजस्विनी आणि मुलाला अन्नातून विष देऊन मारले आणि स्वत: घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोमवारी (दि. १६ जून) सकाळी ११ वाजेपर्यंत जाधव यांच्या घराचा दरवाजा उघडला न गेल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा ठोठावून पाहिला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घराचे दार उघडताच आतमध्ये लक्ष्मण, तेजस्विनी आणि त्यांच्या मुलाचे मृतदेह दिसले. या दृश्याने सर्वांनाच धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांना घरातून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. मात्र, लक्ष्मणच्या कर्जबाजारीपणाची आणि ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली आहे.
“लक्ष्मण खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. पण रम्मीच्या व्यसनाने त्याला उद्ध्वस्त केले. त्याने जमीन, भूखंड सर्व काही विकले, तरी कर्ज फिटत नव्हते. या तणावातूनच त्याने हे भयंकर पाऊल उचलले असावे,” असे गावातील एका वृद्ध व्यक्तीने सांगितले. तेजस्विनी आणि तिच्या मुलाच्या निष्पाप मृत्यूने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि दुख: व्यक्त होत आहे.
या घटनेने ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाचे धोकादायक परिणाम पुन्हा एकदा समोर आणले आहेत. “ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली चालणाऱ्या जुगाराने अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. यावर कठोर कारवाईची गरज आहे,” अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, कर्ज देणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी केली जाणार आहे.
जाधव कुटुंबाच्या या दुर्दैवी अंताने बावी गावात शांतता नांदणाऱ्या सुखी संसाराचा अंत झाला आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.