” मनाला आल्हाद देणारी गेट टू गेदर भेट ठरली अविस्मरणीय!”
हुतात्मा परशुराम ज्युनियर कॉलेजच्या वर्ग मित्रांची 23 वर्षांनी झाली गळाभेट.
वडूज, दि. 20 – विनोद लोहार (प्रतिनिधी )
माणूस कितीही मोठया पदावर पोचला तरी शालेय जीवन, त्यातील गमती जमती मौज मजा तो कधीही विसरत नाही. जीवन जगत असताना तो यां गोष्टी विसरलेला असतो, पण पुन्हा संधी मिळताच तेवढ्याच उत्साहाने याचा मनमुराद आनंद घेतो, याची प्रचिती वडूज येथील हुतात्मा परशुराम ज्युनियर कॉलेज मधील सन 2003-04 च्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या गेट टू गेदर कार्यक्रमात आली.

या ज्युनियर कॉलेज मधील माजी विद्यार्थ्यांचा गेट टू गेदर कार्यक्रम नुकताच पंचरत्न कार्यालयात पार पडला. सर्व विद्यार्थी व त्यांचे शिक्षक यांनी हुतात्मा संकुलात येऊन हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शाळेची घंटा वाजवून सर्व एकत्र जमले, प्रार्थनेचा अनुभव घेतला. त्यानंतर झालेल्या सत्कार सभेत विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा शाल, श्रीफल देऊन सन्मान केला. सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. नागनाथ स्वामी म्हणाले, ” मनुष्य आयुष्य भर आनंदाच्या शोधात भटकत असतो, अनेक मोठ मोठया पदांवर पोचतो,ऐश्वर्य कमावतो, पण आनंदा पासून दूर असतो, नंतर त्याला कळते की, आनंद हा लहान होऊन जगण्यात असतो. “
यावेळी प्रा. भरत बागल, प्रा. रोहिणी बडवे, प्रा. संदीप तिवाटणे व सोमनाथ बुधे यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणीना उजाळा दिला.
दुपारच्या सत्रात संगीत खुर्ची, चुटके, विनोदी किस्से, नकला, नृत्य व गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रा. नागनाथ स्वामी यांनी आईचे महात्म्य वर्णन करणारे ” तू कितनी अच्छि है! ” व ” फिटे अंधाराचे जाळे ” ही गीते गाऊन मनोरंजन केले.त्यानंतर सर्वांनी सह भोजनाचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक सदानंद साबळे यांनी,आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन निलेश माळी, चैतन्य खडके, अफसाना मुल्ला यांनी केले.
कार्यक्रमास राजेश चव्हाण, अजय जगदाळे, पांडुरंग माने, रवींद्र माने, सचिन शिंगाडे, नवनाथ गलांडे, विकास गलांडे, रामदास जाधव, शिरीष महामुनी,सुप्रिया यादव, दिपाली पवार, उषा पाटोळे, माधुरी झेंडे, रुपाली सानप, रुपाली कुंभार, सचिता बुरुंगले, रुपाली जाधव व जयश्री जगदाळे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.