
सातारा : वार्ताहर
सातारा पोलीस व जिल्हा प्रशासन आणि वन विभागाची परवानगी न घेता दि. सहा एप्रिल रोजी रात्री १२ ते पहाटेपर्यंत एस टु सी प्रॅक्टिस मॅरेथॉन स्पर्धा कास पठारावर आयोजित केली होती. ती वेळ ही वन्यप्राण्यांची रात्रीच्या वेळी पाणी पिणे, भटकंती व शिकार करण्याची होती . त्यामुळे सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे प्रायोजकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी महेश अशोक शिवदास यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केली.
कास पठार, सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे संस्थापक व स्पर्धेचे प्रायोजक व इतर जिल्हा प्रशासन, पोलीस व वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिली असून सुद्धा त्यावर उपचार करण्याऐवजी भूल दिल्यासारखे अधिकारी वागत असल्याचाही आरोप तक्रारदार महेश शिवदास यांनी केला आहे. दि. १३ एप्रिल रोजी कास अल्ट्रा या नावाने वरीलप्रमाणेच कृत्य करून भल्या मोठ्या लाईटचे फोकस लावून रस्ता अडवून ही स्पर्धा विनापरवानगी घेतली . याबाबतची तक्रार त्याच रात्री सातारा पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस स्टेशन व सातारा कंट्रोल पोलीस ऑफिस, वनविभाग अधिकारी रौंदळ, चव्हाण यांच्याकडे केली होती. या तक्रारीनुसार दि. सहा एप्रिल २०२५ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आयोजक संदीप काटे व इतरांवर, तसेच दि. १५ एप्रिल २०२५ रोजी कास अल्ट्राचे आयोजक शिव यादव यांच्यावरही गुन्हा दाखल केला . पण त्यांना अटक करण्यासाठी अद्यापही कायदेशीर सल्लागाराचे मत आले नाही याबाबत नवल वाटत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ता व पर्यावरणप्रेमी महेश शिवदास यांनी अधिपत्याखाली येणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेत कोणताही कर्मचारी संबंधित ठिकाणी पाठवला नाही. त्यामुळे वनविभागाच्या आरती भारद्वाज, रौंदळ व चव्हाण त्याचप्रमाणे वरील दोन्ही स्पर्धा घेणारे आयोजक, भागीदार, संचालक मंडळ, स्पर्धक व हॉलिनटीअर (स्वयंसेवक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावेत. तसेच यापुढे वन्यप्राण्यांच्या अधिवासात कोणतीही स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी देऊ नये. या स्पर्धा आयोजकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाबाहेर सातारा जिल्ह्यातील वन्यप्रेमी, पर्यावरणप्रेमींच्या साथीने आमरण उपोषणास बसणार आहे. याची याची संपूर्ण जबाबदारी सातारा जिल्हा प्रशासन व वनविभाग तसेच पोलीस प्रशासनाची राहील, असा इशारा श्री महेश शिवदास यांनी दिला आहे.
फोटो – हाफ फिल्म मॅरेथॉन स्पर्धेचे प्रतिनिधित्विक स्वरूपातील फोटो