Advertisement

श्रमसंस्कार शिबिर समाजसेवेचा पाया – प्रा. विश्वंभर बाबर


म्हसवड (प्रतिनिधी)
महाविद्यालयीन जीवनातील श्रमसंस्कार शिबिर हा समाजसेवेचा पाय असल्याचे प्रतिपादन कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी देवापुर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात केले.
श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर देवापूर येथे आयोजित केले होते. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबतचे मार्गदर्शन प्रा. विश्वंभर बाबर यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. वाय.वाय. दुबाले, प्रा. ए. एम. लांब, प्राध्यापिका ए. आर. माने, शिबिरार्थी विद्यार्थी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर म्हणाले स्पर्धा परीक्षेचा पाया शालेय स्तरावरच सुरू होतो. स्पर्धा परीक्षा हे सरकारी नोकरी मिळवण्याचे एक साधन असून त्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. काय वाचावे,किती वाचावे व कुठून वाचावे ही स्पर्धा परीक्षेची त्रिसूत्री असल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले.
यावेळी विश्वंभर बाबर यांनी यूपीएससी, एमपीएससी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती , अभ्यासाचे नियोजन , अवांतर वाचन, परीक्षेचे स्वरूप व नियोजन , अभ्यास कौशल्य, अभ्यास पद्धती, इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.
माण तालुक्यात नैसर्गिक दुष्काळ असला तरी बुद्धीचा सुकाळ असून माण ही नर रत्नाची खाण असल्याचे सांगितले. परिस्थितीवर मात करून माण तालुक्यातील अनेक मान्यवरांनी केंद्र व राज्य प्रशासनात सर्वोच्च ठिकाणी प्रभावीपणे काम केल्याचे अनेक दाखले प्रा.बाबर यांनी दिले. श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांनी देवापुर गावात केलेल्या कामाचा तसेच संयोजक प्राध्यापकांच्या आदर्श नियोजनाचा गौरव विश्वंभर बाबर यांनी केला. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सांघिकपणा तसेच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम होत असल्याचे विश्वंभर बाबर यांनी सांगितले. यावेळी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून देवापूर येथे केलेल्या कार्याची माहिती प्राध्यापक दुबाले यांनी दिली.

error: Content is protected !!