
म्हसवड….प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या म्हसवड येथील क्रांतिवीर शाळेच्या बाल बाजाराला विद्यार्थी, पालक व ग्राहक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या ठिकाणी 3 लाख 40 हजार रुपयाची उलाढाल झाल्याचे संयोजकांनी सांगितले.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे बाल बाजार उपक्रमाचे आयोजन केले होते. सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण सावंत यांचे हस्ते बाल बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल माने, शार्दुल सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डीवायएसपी अरुण सावंत म्हणाले क्रांतिवीर शाळेने राबवलेला बाल बाजार उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. विविध स्वरूपाच्या व्यवहारिक ज्ञानाची ओळख व्हावी, शेतमाल माहिती, विविध फळभाज्या, पालेभाज्यांची ओळख याबरोबर चलनाची देवाणघेवाण यासाठी बाल बाजार मार्गदर्शक असल्याचे सावंत यांनी सांगितले.




क्रांतिवीर शाळा उपक्रमशील असल्यामुळेच शाळेने अल्पावधीत विविध शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर तसेच शिक्षकांचे सुयोग्य नियोजन असल्यामुळेच शाळेतून हजारो आदर्श विद्यार्थी घडत असल्याबद्दल अरुण सावंत यांनी समाधान व्यक्त केले.
संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर म्हणाले माणचे सुपुत्र अरुण सावंत यांनी राज्य लोकसेवा आयोगा च्या परीक्षेत तात्कालीन वेळी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. पोलीस महासंचालक पदक तसेच राष्ट्रपती पदक मिळवून सावंत यांनी माण तालुक्याची शान राष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवली म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी बाल बाजाराची संकल्पना स्पष्ट करून शाळेतील विविध उपक्रमाची माहिती दिली. विशेष म्हणजे मुख्य अतिथी अरुण सावंत यांनी स्वतः विद्यार्थी विक्रेत्या कडून फळे, भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या बाल बाजारात 500 हून जास्त विद्यार्थी सहभागी झाले तसेच एकूण 3 लाख 40 हजार रुपयाची उलाढाल झाल्याची माहिती संयोजकांनी दिली.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक पालक तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.