Advertisement

यशस्विनी सन्मान पुरस्कार, प्रस्ताव पाठवू शकता!

पुणे 24

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून यशस्विनी सन्मान पुरस्कार सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच चौथ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी १२ जानेवारी २०२४ पासून १२ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येईल.

कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप
रुपये २५ हजार, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यशस्विनी सन्मान पुरस्कार २०२५

यशस्विनी कृषी सन्मान

यशस्विनी साहित्य सन्मान

यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान

यशस्विनी उद्योजिका सन्मान

यशस्विनी सामाजिक सन्मान

यशस्विनी पत्रकारिता सन्मान

अधिक माहितीसाठी :


पल्लवी वाघ -७७९८९५३६३१
women@chavancentre.org

जि.प.शाळेतील मुलींना मोफत सायकल वाटप.

शाळेतील मुलींना मिळाल्या नवीन सायकली, चावी हाती येताच मुलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य,
किरण गायकवाड व ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्ताने भगत माळी यांचा उपक्रम


मुरुम, ता. उमरगा, ता. २४ (प्रतिनिधी) : शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद उर्फ भगत माळी यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद कन्या प्रशालेत सात सायकलीचे वाटप करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्याचे माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले व मराठवाडा युवासेना पक्ष निरीक्षक किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. २४) रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशालेत शिकत असलेल्या ग्रामीण भागातून दररोज ये-जा करणाऱ्या होतकरू व गरीब विद्यार्थिनींना सात सायकलीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून भगत माळी यांनी स्वखर्चाने सायकली देत असल्याचे भगत माळी यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंकावती कांबळे म्हणाल्या की, भगत माळी यांनी आमच्या प्रशालेला सात सायकली दिल्याचे कौतुक, समाधान व आभार व्यक्त केले. संदीप बाबळसुरे, वैभव इंगळे, प्रतिक राठोड, विठ्ठल चौधरी, प्रशांत राठोड, सोनाली कलशेट्टी, स्वप्नील पाटील, शेके गुरुजी, अलका गायकवाड, विजय महामुनी, सचिन राठोड आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना जाधव तर आभार सोनाली कलशेट्टी यांनी मानले. शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत वाढदिवसाचे औचित्य साधून सात विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करताना मान्यवर व शिक्षकवृंद.

माजी आमदार धोंडीराम वाघमारे स्मृती दिनानिमित्त वडजल ता. माण येथे २८ रोजी कवी संमेलन

म्हसवड (वार्ताहर)
माण तालुक्याचे माजी आमदार धोंडीरामजी वाघमारे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त वडजल तालुका माण येथे दि २८ जानेवारी रोजी भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कवी संमेलनासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, साहित्यिक रामदास फुटाणे, लेखक,कवी विठ्ठल वाघ, कवी संजीवनी तळेगावकर, प्रकाश होळकर प्रशांत मोरे भरत दौंडकर श्रीमती लता ऐवळे रमजान मुल्ला इत्यादी मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती माजी आमदार धोंडीराम वाघमारे यांचे चिरंजीव अभय वाघमारे यांनी दिली आहे….

फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएशन परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. शोएब मुल्ला यांचा इंजि. सुनील पोरे यांचे हस्ते सत्कार

म्हसवड, (वार्ताहर)

२४ जानेवारी – म्हसवड येथील युवा डॉक्टर डॉ. शोएब अहमद मुल्ला यांनी फिलिपीन्स येथील इंजिलीस युनिव्हरसिटी फौंडेशन येथून एम. बी. बी. एस पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी अतिशय कठीण समजली जाणारी भारतातील फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएशन परीक्षा (FMG) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन उत्कृष्ट गुण मिळवले आहेत. त्यांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

हा सत्कार म्हसवड येथील शुभम भारत गॅस एजन्सीचे सर्वेसर्वा आणि संत.नामदेव समाज परिषदेचे . जिल्हा अध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांचे हस्ते पार पडला. डॉ. शोएब मुल्ला यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार विजय टाकणे, पत्रकार पोपट बनसोडे, डॉ. सोफिया मुल्ला यांची उपस्थिती होती.

डॉ. शोएब मुल्ला हे पत्रकार अहमद मुल्ला यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या कुटुंबाने कायमच समाजसेवेतील कार्य केले आहे. डॉ. शोएब मुल्ला यांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात अत्यंत मेहनतीने केली असून, या यशामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

यावेळी इंजि. सुनील पोरे यांनी त्यांना पुढील जीवनातही यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि ते म्हणाले, “डॉ. शोएब मुल्ला यांनी फक्त आपल्या कुटुंबाचीच नाही , तर आपल्या समाजाची मान उंचावली आहे. हे यश केवळ त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे.”

पत्रकार विजय टाकणे आणि पोपट बनसोडे यांनीही त्यांच्या यशाची सराहना केली आणि सांगितले की, “आपण असं यश मिळवले की, ते पुढच्या पिढीला एक प्रेरणा देईल.”

या कार्यक्रमाने एकत्र आलेल्या सर्व उपस्थितांनी डॉ. शोएब मुल्ला यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या इथून पुढील मेडिकल करिअरमध्ये आणखी यश मिळवण्याची आशा व्यक्त केली.

साताऱ्यात आंदोलनानंतर ठेकेदार काळ्या यादीत, वन विभागाची चौकशी

साताऱ्यात आंदोलनानंतर ठेकेदार काळ्या यादीत, वन विभागाची चौकशी

(अजित जगताप)
सातारा दि: सातारा शहरातील
सामाजिक, माहिती अधिकार, पर्यावरणप्रेमी सुशांत मोरे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दि.२३ पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत श्री. मोरे यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेतला. कायद्याच्या रक्षणकर्त्यांकडूनच दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागते. अशी ही साताऱ्याची तऱ्हा जग जाहीर झाली आहे.

नेहमीच आंदोलन केल्याशिवाय साताऱ्यात न्याय मिळत नाही. ही एक प्रथा झालेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्यकर्ते व अधिकारी आहेत. हे सुद्धा या निमित्त अधोरेखित झालेले आहे.सातारा नगरपालिकेच्या ठेकेदारास खोटी कागदपत्रे दिल्याने काळ्या यादीत टाकण्यात आले. वन विभागातील गैरकारभाराची ४५ दिवसात चौकशी होऊन कारवाई केल्याचा अहवाल देणे, झाडाणी येथील विद्युत कनेक्शनबाबतही तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. तर महसूल, नगरविकास, जि.प.सह विविध विभागातील मागण्यांबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने श्री. मोरे यांनी उपोषण स्थगित केले. उपजिल्हाधिकारी श्री विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते सरबत घेऊन श्री. मोरे यांनी उपोषण सोडले. कार्यकर्त्याला उपोषण का करावे लागते ? याबाबत मात्र कुणीच खुलासा केला नसल्याने जिल्हा प्रशासनाचे खाजगीकरण झाल्यास नवल वाटणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
श्री. मोरे यांनी विविध प्रकरणातील माहिती अधिकारानुसार कागदपत्रे मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई करावी अन्यथा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. माहिती सुद्धा दिली पण कारवाई होत नाही. त्याला प्रशासन तरी कसे म्हणावे ? संबंधित यंत्रणेला जनाची नाही पण मनाची ही वाटत नाही. प्रामुख्याने जावळी वर्गातील वन अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा गैरवापर केला आहे. जर जिल्हा नियोजन अधिकारी जर कामवाटप समितीचे निगराणी करत असेल तरी इतरांबद्दल न बोललेलं बरे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लवकरच त्यांची उचल बांगडी होण्याची संकेत मिळत आहे.
झाडाणी येथील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात वीज कनेक्शन घेऊन वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी चांगलाच उजेड पाडला आहे. नगरपालिकेचा ठेका घेताना ठेकेदाराने दिलेली खोटी कागदपत्रे सादर केली त्याची पडताळणी करण्याची तसदी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी घेतली नाही.
वन विभागाच्या तक्रारीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस सहाय्यक उपवनसंरक्षक झांझुर्णे, श्री. रौधंळ उपस्थित होते. यावेळी वन विभागाने केलेल्या कामांची ४५ दिवसात चौकशी करुन त्याबाबत काय कारवाई केली ? याचा अहवाल देण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नागेश पाटील यांनी यावेळी दिल्या.
सातारा नगरपालिकेच्या दलित वस्तीच्या कामातील निविदा घेताना ठेकेदार कुणाल गायकवाड, पुणे यांनी निविदेसोबत खोटी कागदपत्रे जोडल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रानुसार स्पष्ट झाले होते. याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कुणाल गायकवाड यांना यापुढे निविदे प्रक्रियेत सहभाग घेण्यास मनाई करत काळ्या यादीत टाकले आहे. त्याचप्रमाणे झाडाणी येथील पर्यावरणदृष्टया संवेदनशील क्षेत्रात देण्यात आलेल्या वीज कनेक्शनबाबत कारवाई करण्याची मागणी श्री. मोरे यांनी केली होती. याबाबत महावितरणच्या अधिक्षक अभियंता यांनी याबाबत चौकशी सुरु असून लवकरच दोषींवर कारवाई करणार असल्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच इतर विविध मागण्यांबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करण्याचे आश्वास दिल्याने श्री. मोरे यांनी उपोषण स्थगित केले.
उपोषण सोडल्यानंतर बोलताना श्री. मोरे यांनी प्रशासनाने केलेल्या कार्यवाही बद्दल आभार मानले. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना २००५ च्या कायद्यानुसार दोन पेक्षा अपत्य असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण रोहिणी ढवळे आणि सर्व तालुक्यांचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे माहिती मागितली होती परंतु त्यांनी खोटी माहिती दिल्याचे पडताळणी अंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पुणे येथील महिला व बालकल्याण आयुक्त यांच्या दालनासमोर दि. ३ मार्च २०२५ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही श्री. मोरे यांनी यावेळी दिला.
कोयना धरण शिवसागर जलाशयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुनावळे ता. जावळी येथे जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प विकसित करताना बांधकाम व पायाभूत सुविधांच्या तसेच बोटी व जलपर्यटन संबंधित कामांच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. तो आता वर्षभरानंतर उघड झालेले आहे त्यामुळे खरे लाभार्थी यांचे शोध घेणे गरजेचे असल्याची चर्चा मुनावळे परिसरात सुरू झालेली आहे.


फोटो सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना कार्यकर्ते (छाया- अजित जगताप सातारा)

error: Content is protected !!