मुरूम शहरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते दुग्धाभिषेक….. मराठा सेवा संघाचा पुढाकार

Spread the love

मुरूम शहरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते दुग्धाभिषेक….. मराठा सेवा संघाचा पुढाकार
(मुरुम प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील शिवाजी चौकात शुक्रवारी (ता. ६) रोजी मराठा सेवा संघाकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पानिपत येथे कार्यरत असलेले मुरुमचे सुपुत्र डॉ. शिवाजी शिंदे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, गणेश अंबर, बशीर जमादार, सचिन शिंदे आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करुन पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवभक्तीने भारलेल्या वातावरणात जय जिजाऊ, जय शिवराय चा गजर ऐकू येत होता. यावेळी अजित चौधरी, श्रीकांत मिनियार, डॉ. शिवाजी शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. त्यांनी बोलताना सांगितले की, आजच्या तरुणांनी महाराजांच्या शौर्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी काम करणे गरजेचे आहे. शिवराज्याभिषेक ही आत्मसन्मानाची घोषणा होती. आपल्या भूमीत स्वराज्य स्थापणेचा अभिमान महाराजांनी दाखवला. त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य ही केवळ राजसत्ता नव्हती, तर ती सामाजिक समता व न्यायाची चळवळ होती. अशा कार्यक्रमांद्वारे नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. महेश मोटे होते. अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते म्हणाले की, शिवराज्याभिषेक ही धार्मिक वा केवळ राजकीय घटना नव्हती तर ती सामाजिक समतेचा संदेश देणारी घटना होती. महाराजांनी सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालवलेले शासन हे आजच्या काळात आदर्श ठरावे असे आहे. महाराजांच्या समाजकारण व राजकारणाचा आजच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी देखील अवलंब केला पाहिजे. याप्रसंगी लखन भोंडवे यांनी ओघवत्या शैलीत प्रास्ताविक सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन जाधव तर मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष श्रीधर इंगळे यांनी आभार मानले. यावेळी चंद्रशेखर मुदकन्ना, रफिक पटेल, प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड, सुरेश मंगरूळे, बाबा कुरेशी, गौस शेख, शाहूराज शिंदे, आनंद भुसाळे, आप्पासाहेब बोराळे, धनराज शिंदे, भरत व्हनाळे, ज्योतिबा शिंदे, सिद्धलिंग हिरेमठ, हारून जेवळे, शाहीद येणेगुरे, आकाश क्षीरसागर, सुरेश गायकवाड, बाबुराव बेगमपुरे, मनीष ब्याळे आदींची उपस्थिती होती. संजय सावंत, अजिंक्य मुरुमकर, गणेश कडगंचे, हुसेन तांबोळी, प्रल्हाद माने आदींनी पुढाकार घेतला.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने शिवाजी चौकात शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी मान्यवर, पदाधिकारी व अन्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!