लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यात मानवतावादी केंद्रबिंदू प्रस्थापित: प्रा. डॉ. राहुल पालके
प्रतिनिधी: बार्शी
अण्णाभाऊ साठे यांचा ध्येयवाद व जीवनप्रवास यात वास्तविकतेचे निखारे होते. केवळ कल्पनाशक्तीच्या भराऱ्या घेवून उपक्षितांचे प्रश्न मिटणार नाहीत. त्यासाठी संघर्ष करून न्यायासाठी तत्पर होणे गरजेचे आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रतिभाशक्ती व कार्यप्रवणता यांचा मिलाफ म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे यांनी केले. जनस्वराज्य फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, हडपसर, पुणे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीच्या कार्यक्रमात ते घारी या गावी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी १९४२ च्या राष्ट्रीय आंदोलनातील आठवणींना उजाळा देत संयुक्त महाराष्ट्र चळवळीला वेग देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राहुल पालके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकला. कांदबरी,कथा,पद्य,नाटक,लोकनाट्य, पोवाडा, लावणी,शाहिरी, प्रवासवर्णन आदींच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी दिलेली आर्त हाक व समाजाचे वास्तववादी चित्रण याचे त्यांनी विवेचन केले. लाल बावटा पथक यातून त्यांनी दिलेले योगदान व अमर शेख व द.वा .गव्हाणकर यांच्याबरोबर केलेल्या कार्याचा त्यांनी आढावा प्रस्तुत केला.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यात मानवतावादी केंद्रबिंदू आहे. अण्णाभाऊंचे साहित्य वाचून केवळ दलितांच्या समस्या समोर येत नाहीत तर सर्व स्तरांतील वंचितांचे जीवन व त्यांचे प्रश्न सामोरे येतात असेही प्रा. पालके म्हणाले. जनस्वराज्य फाऊंडेशनचे संचालक दशरथ उकिरडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्व व कार्याचा परिचय करून दिला. आर्टीच्या माध्यमातून होत असलेल्या शैक्षणिक विकासाचा आराखडा मांडला. तसेच जनस्वराज्य फाऊंडेशनमार्फत घेण्यात आलेल्या विविध सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती सांगितली. या कार्यक्रमाप्रसंगी कु.आरोही शहाणे हिने अण्णाभाऊंची माझी मैना गावाकडे राहिली.. ही छक्कड गाऊन उपस्थितांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थ, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.