म्हसवड पालिकेकडुन अतिक्रमणे जमीनदोस्त
पोलीस बंदोबस्ताद कारवाई,

म्हसवड . (महेश कांबळे.)
म्हसवड नगरपरिषदेचे डँशींग मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी पालिका हद्दीतील वादग्रस्त व तक्रार असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करीत सदरची अतिक्रमणे जमीनदोस्त केली, यावेळी पालिकेचे सर्व कर्मचारी व मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.
म्हसवड नगरपरिषदेच्या हद्दीत एका ठिकाणी विनापरवाना बेकायदेशीरपणे बांधकाम करुन त्याचे एका धर्मस्थळात रुपांतरीत करण्यात येवुन त्याठिकाणी हिंदु धर्मियांचे धर्म परिवर्तन करण्याचे प्रकार सुरु असल्याची तक्रार पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना प्राप्त झाल्याने त्यांनी संबधित ठिकाणी जात पाहणी करुन आजुबाजुला चौकशी करीत संबधित बांधकाम मालकाला नोटीस बजावली होती, तर येथील सिध्दनाथ विद्यालयानजीक असलेल्या लोहार कुटुंबियांचे ही राहते घर त्याठिकाणी सुरु असलेल्या विकासकामाला अडथळा ठरत असल्याने ते काढण्यासाठी पालिकेने लोहार यांना नोटीस बजावली होती, मात्र पालिकेच्या या नोटीसीला लोहार कुटुंबियांनी आक्षेप घेत सदरचे घर हे आमच्या स्वमालकीचे असल्याचा दावा पालिकेकडे करीत या नोटीस विरोधात गत ८ दिवसांपासुन पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे, या दरम्यान पालिका प्रशासनाने लोहार यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याकडे स्वमालकिचे घर असल्याची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले होते मात्र लोहार यांच्याकडे सक्षम कागदपत्रे नसल्याने अखेर पालिकेने मोठा पोलीस फौजफाटा सोबत घेत लोहार यांचे घर जमीनदोस्त केले, विशेष म्हणजे ही कारवाई सुरु असताना लोहार समाजाचे पालिकेसमोर उपोषण सुरुच होते, या कारवाई दरम्यान लोहार यांच्या वकिलांचा पालिका प्रशासन, व पोलीसांशी वाद ही झाला मात्र पालिका प्रशासनाने कोणालाही न जुमानता ही कारवाई करीत लोहार यांचे घर जमीनदोस्त केले.
दरम्यान ही कारवाई सुरु असताना बघ्यांनी मात्र मोठी गर्दी केली होती. तर प्रशासन हे सामान्य लोकांच्या अतिक्रमणावरच कारवाई करीत असुन बड्या धेडांना मात्र अभय देत असल्याचा आरोप ही सामान्य नागरीकांतुन यावेळी करण्यात आला.
लोहार कुटुंबिय नजर कैदेत -?
पालिकेने आपले राहते घर पाडु नये याकरीता पालिकेच्या विरोधात गत ८ दिवसांपासुन येथील लोहार कुटुंबियांनी उपोषण सुरु केले असले, तरी पालिकेने त्यांना न जुमानता त्यांचे घर जमीनदोस्त केले, यावेळी उपोषणकर्त्यांकडुन कोणताही अनुसूचित प्रकार घडु नये याकरीता प्रशासनाने उपोषणस्थळी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवत उपोषणकर्त्यांवर बारीक नजर ठेवली होती.
पालिका प्रशासनाचा रुटमार्च करीत अतिक्रमणधारकांना इशारा –
म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी या कारवाईनंतर पालिकेचे कर्मचारी, महसुलचे कर्मचारी व पोलीस फौजफाटा, सोबत जे सी बी घेत येथील पंढरपुर नाका ते सिध्दनाथ मंदिर या दरम्यान रुट मार्च काढीत ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी त्वरित काढुन घेत कटु कारवाई टाळण्याचे आवाहन केले.
प्रतिक्रिया –
सर्वच अतिक्रमणावर
प्रशासनाची करडी नजर -
मुख्याधिकारी डॉ. सचिन माने –
म्हसवड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत ती प्रशासनालाही माहिती आहेत, मात्र आज जी अतिक्रमणे पाडण्यात आली त्यावर तक्रारी होत्या तर काही विकासकामांना अडथळा निर्माण करणारी होती म्हणुन ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र ज्यांची अतिक्रमणे आहेत त्यांनी यावरुन एक धडा घ्यावा की आपल्यावरही एक दिवस अशीच कारवाई होणार आहे.



