
गोंदवले. — गोंदवले बुद्रुक येथील डाकबंगला येथे ०४ महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराने हे काम इतक्या चांगल्या दर्जाच केलं आहे की लोकांना आता त्याच्याविरोधात रस्त्यावर उतराव लागले आहे. या विषयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून हा विषय मार्गी नाही लागला तर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.
संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या शेतातीलच माती साइड पट्टीवर भरून रस्त्यावर कमी डांबर ओतून रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा केला आहे. यावर स्थानिक लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तसेच निवेदन देऊन देखील या कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी केली होती. मात्र स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक नागरिकांच्या या दुर्लक्षित प्रश्नासंदर्भात पुढे आली आहे.
या विषयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा संशयदेखील धैर्यशील पाटील यांनी व्यक्त करत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर मनसेस्टाईलने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांच तोंड काळ करू, असा इशारादेखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.