राजेंद्र टाकणे यांचे प्रतिपादन
म्हसवड प्रतिनिधी
खेळामध्ये एकसंघपणा हीच खरी ताकद असून, संघभावना हीच यशाकडे जाण्याची पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन राज्य गुप्तवार्ता विभाग, नांदेड येथील अप्पर पोलीस उपायुक्त राजेंद्र टाकणे यांनी केले.
म्हसवड येथील कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल येथे शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, सचिव सौ. सुलोचना बाबर, उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर, प्राचार्य विन्सेंट जॉन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खेळ हा शालेय जीवनाचा अविभाज्य भाग
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र टाकणे म्हणाले की,
“खेळ हा शालेय जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. अभ्यासाइतकाच खेळाला देखील प्राधान्य दिले पाहिजे. खेळामुळे सक्षम आणि निकोप शरीरसंपत्ती निर्माण होते तसेच मानसिक शिस्तही विकसित होते.
यश-अपयशापेक्षा सहभाग महत्त्वाचा आहे. कोणत्याही स्पर्धेतील यशाचा मार्ग कठीण असला तरी टीमवर्कच्या जोरावर तो सहज सोपा करता येतो. विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासाबरोबर शालेय क्रीडा स्पर्धेतही सहभाग घेतला पाहिजे.”
यशस्वी खेळाडूंपासून प्रेरणा घ्या
अप्पर उपायुक्त टाकणे पुढे म्हणाले की,
“माण तालुक्याची कन्या ललिता बाबर हिने खेळाच्या जोरावर ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला आणि आज ती उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहे. अशा यशस्वी खेळाडूंमधून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रेरणा घेऊन आपली क्षमता सिद्ध करावी.”
संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान
क्रांतिवीर शाळेच्या उभारणीपासून ते आजच्या डौलदार रुपापर्यंतचा प्रवास पाहिल्याचे सांगून टाकणे यांनी संस्थेच्या उपक्रमशीलतेबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेच्या परिसरात होत असलेल्या प्रगतीकडे पाहून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व क्रीडा संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची भाषणे व शुभेच्छा
उद्घाटनप्रसंगी टाकणे यांनी सर्व खेळाडूंना आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी पाहुण्यांची ओळख करून देत शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विन्सेंट जॉन यांनी केले.
सूत्रसंचालन समन्वयक अभिजीत सावंत यांनी केले.
उपस्थित मान्यवरांचे आभार चंद्रकांत तोरणे यांनी मानले.



