
…
म्हसवड.. प्रतिनिधी
मानवी जीवन सुसहाय्य करण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी म्हसवड येथे केले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने क्रांतिवीर शैक्षणिक संस्था संचलित क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे हस्ते विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, संस्था सचिव तसेच राज्य शासन वनश्री पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने, गोपनीय विभागाचे पोलीस अभिजीत भादुले, तुकाराम घाडगे, संजय नरळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अक्षय सोनवणे म्हणाले नुकत्याच संपलेल्या उन्हाळ्यात आपण सर्वांनी अति उष्णतेचा अनुभव घेतलेला आहे. अति उष्मा मुळे भविष्यातही पृथ्वीवरील सजीवांना मोठा धोका आहे . बेसुमार वृक्षतोड व इतर माध्यमातून निसर्गाचा ऱ्हास होत असल्याने पृथ्वीवरील तापमान दिवसे दिवस वाढत आहे. यावर एकच उपाय तो म्हणजे वृक्षारोपण होय. किमान एक विद्यार्थी एक झाड लागवड ही मोहीम राबवल्यास पर्यावरण संतुलनासाठी आपणही खारीचा वाटा उचलू शकतो हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे . वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ही सोनवणे यांनी केले. क्रांतीवीर शाळा ही उपक्रमशील शाळा असल्याचे विविध दर्जेदार सामाजिक कृतीतून स्पष्ट होत आहे. मागील कालावधीत या शाळेने राबवलेल्या सातत्यपूर्ण वृक्षारोपण उपक्रमामुळे राज्य स्तरावरील वनश्री पुरस्कार क्रांतिवीर शाळेला मिळाला ही गौरवास्पद बाब असल्याचेही अक्षय सोनवणे यांनी सांगितले .
मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी शाळेतील विविध उपक्रमाची माहिती उपस्थितताना दिली. या निमित्ताने बकुळ , बॉटल पाम, फिश टेल पाम, कांचन , नारळ , सप्तपर्णी , ख्रिसमस ट्री ,जास्वंद इत्यादी सावली देणाऱ्या व शोभिवंत झाडाची लागवड शाळेच्या प्रांगणात करण्यात आली. यावेळी संकुलातील शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवराचे आभार तुकाराम घाडगे यांनी व्यक्त केले.