म्हसवड.. प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जतन करण्यासाठी क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम घेण्यात आले.
देशाची युवा पिढी बलवान व सक्षम राहावी यासाठी क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील आत्मगिरी माध्यमिक विद्यालय म्हसवड , क्रांतिवीर नागनाथ नायकवाडी शाळा म्हसवड, नूतन मराठी शाळा म्हसवड शाळेतील हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत जागतिक सूर्यनमस्कार दिन आयोजित केला होता. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव तसेच संकुलातील सर्व शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड अंतर्गत चे योग प्रशिक्षक जगन्नाथ लोहार यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार तसेच विविध योगासने याबाबत प्रात्यक्षिके करून दाखवली. या उपक्रमात क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील हजारो विद्यार्थी रंगीबेरंगी ट्रॅक सूट च्या वेशात सहभागी झाले होते. यानिमित्ताने सूर्यनमस्काराच्या विविध प्रकाराची प्रात्यक्षिके, प्राणायाम, कपाल भारती, बसरीका, पद्मासन, भुजंगासन,मुद्रासन, धनुरासन, ताडासन इत्यादी बाबत प्रात्यक्षिके प्रशिक्षकासमवेत करून दाखवली. तसेच व्यायामाचे महत्त्व, शारीरिक मानसिक संतुलन, एकाग्रता याबाबतचे महत्त्व जगन्नाथ लोहार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या निमित्ताने क्रीडाशिक्षक तुकाराम घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमात सहभागी झालेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आनंद व उत्साह निर्माण झाल्याचे मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी सांगितले. सुदृढ शरीरासाठी व बलशाली भारत देश घडवण्यासाठी नियमित योगासन, व सूर्यनमस्कार करण्याचे आवाहन सुलोचना बाबर यांनी केले.
