
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
औंध मंगळवारी सायंकाळी औंध परिसरात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने बाजारपेठ आणि परिसरात मोठा गोंधळ उडवून दिला. आठवडे बाजार असल्याने गावात व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. पावसाच्या तीव्रतेमुळे काही काळ बाजारपेठ ठप्प झाली आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
सायंकाळी पाचच्या सुमारास सुरुवात झालेला पाऊस दोन तासांहून अधिक काळ कोसळत राहिला. त्यामुळे बाजारात आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. अनेकांनी जवळच्या दुकानांच्या पत्राशेडमध्ये, कट्ट्यांखाली आसरा घेतला. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिक आणि व्यापारी दोघेही अडकल्याचे दृश्य दिसून आले.
व्यापाऱ्यांना आपल्या मालाचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने पावसापासून संरक्षणाची उपाययोजना करावी लागली. पत्रे, प्लास्टिकच्या शीट्स, ताडपत्री इत्यादींच्या साहाय्याने माल झाकण्यात आला. काहींचे नुकसान टळले, तर काही व्यापाऱ्यांच्या मालावर पावसाचा फटका बसल्याचे निदर्शनास आले आहे.
औंध परिसरातील शेतकऱ्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. अनेकांनी त्यांच्या शेतात कांद्याच्या ऐरणी उभारल्या होत्या. मात्र, या ऐरणींमध्ये पाणी साचल्यामुळे कांदा नासण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “पाणी शिरल्यामुळे कांदा खराब होण्याची शक्यता आहे, यामुळे मोठे नुकसान होईल,” अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
ग्रामपंचायतीकडून बाजारासाठी आधीच पत्राशेड आणि कट्ट्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जी नागरिकांना व्यापाऱ्यांना उपयोगी ठरली. मात्र नैसर्गिक आपत्तीसमोर शेवटी सर्वच बळ अपुरे पडतात, हे यावेळी पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले.