
पिंपोडे बुद्रुक/ प्रतिनिधी /अभिजीत लेंभे
कधी काळी एकत्र बसून वर्गात धडे ऐकणारी तीच मंडळी, आज वेळेच्या वाळवंटातून मार्ग काढत पुन्हा एकत्र आली – भारत विद्या मंदिर व जुनिअर कॉलेज वाघोलीच्या सन २००३ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर दिनांक १८ मे २०२५ रोजी अतिशय उत्साहात साजरा झाला.
या खास दिवशी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व मित्रमैत्रिणी आणि आदरणीय शिक्षक वर्ग पुन्हा एकत्र आले.यावेळी श्री.महाजन सर, श्री.धुमाळ सर,श्री.पिसाळ सर आणि श्री.काशीद मामा यांची उपस्थिती ही कार्यक्रमाची शान ठरली. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यांतील आनंद पाहून सारेजण भारावून गेले.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त केली. वर्षानुवर्षं दूर असले तरी मनानं जवळ असलेली ती मैत्री, या दिवशी पुन्हा हृदयात जागी झाली. तब्बल ५५ विद्यार्थी पुन्हा एकत्र आले, आणि जुन्या आठवणींच्या पानांवर प्रेमाने रंग भरले.
या सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे शाळेच्या, शिक्षकांच्या आणि सर्व विद्यार्थ्यांच्या गटछायाचित्राचं एक सुंदर फ्रेम स्वरूपातील स्मरणचिन्ह, जे सर्वांना भेट देण्यात आलं – आयुष्यभर जपून ठेवावं असं आठवणींचं गिफ्ट.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन श्री.रोहित भोईटे, सौ.पूजा जगताप,श्री. तुषार जाधव,श्री. महेश भोईटे,श्री.अभिजीत नावडकर आणि श्री.गणेश भोईटे यांनी केलं. श्री.महेश भोईटे यांनी उत्स्फूर्त सूत्रसंचालन करत वातावरण रंगवलं आणि श्री.गोविंद जगताप यांनी प्रेमळ शब्दांत आभार मानले.
यावेळी सामाजिक बांधिलकीचं दर्शनही घडलं – लोकराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि शाळेचे माजी विद्यार्थी श्री. रोहित संभाजी भोईटे यांनी शाळेला वाल कंपाऊंड बांधून देण्याचा संकल्प जाहीर केला. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेचं मनःपूर्वक कौतुक केलं.
ही केवळ भेट नव्हती – ती होती एकत्र येण्याची गरज, स्मृतींचा उत्सव, आणि पुढच्या वाटचालीसाठी एकमेकांचा हात घट्ट पकडण्याची नवी सुरुवात.
कधी कुठे, कोणत्या भूमिकेत असलो तरी… ‘आपण सर्वजण भारत विद्या मंदिरचे विद्यार्थीच आहोत’ – हीच खरी ओळख आहे.