
म्हसवड… प्रतिनिधी
म्हसवड चांदणी चौक पोलीस स्टेशन शिक्षक कॉलनी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या भयानक नादुरुस्त चित्तरकथेला जबाबदार कोण ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
म्हसवड हे नगरपालिकेचे शहर होय.
म्हसवड नगरपालिकेला सर्वात जास्त आर्थिक उत्पन्न देणारा परिसर म्हणजे शिक्षक कॉलनी व आसपास चा भाग आहे . शैक्षणिक हब असणाऱ्या या रस्त्यावर स्थानिक दोन व रस्त्याच्या नजीकच्या परिसरात तीन शैक्षणिक संस्थेला जोडणारा म्हसवड चांदणी चौक ते क्रांतिवीर शाळा हा रस्ता होय. पोलीस स्टेशनला जाणाऱ्या येणाऱ्या साठी सुद्धा हा महत्त्वाचा रास्ता. म्हसवड शहरात सातारा पंढरपूर हायवे नंतर सगळ्यात जास्त वाहतूक असणारा सुद्धा चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्ता. या रस्त्याचा परिसर विकसनशील असल्यामुळे शेकडोच्या पटीत व्यवसायिकांनी आपला व्यवसाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरू केलेला आहे. एकंदरीत म्हसवड शहरातील नागरिकांसाठी हा रस्ता दळणवळणाची महत्त्वाची विकास वाहिनी आहे.
मात्र गेल्या दोन महिन्यापासून सदर रस्ता दयनीय मरण यात्रा सहन करत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून अनेक मान्यवरांनी अनेक वर्ष शासन दरबारी पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून खूप वर्षानंतर रस्त्याचे काम मंजूर झाले. हेवे दावे न पाहता रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र दरम्यानच्या कालावधीत विकास कामाला दृष्ट लागली. शासनाने सदर रस्त्याच्या विकासासाठी दोन तुकडे केले. चांदणी चौक ते बीएसएनएल ऑफिस पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण तर येथून पुढे कॉलनी पर्यंत डांबरीकरण. रस्ता दुरुस्ती काम सुरू झाल्यावर खडीकरण झाल्यानंतर 20 एप्रिल पासून ते काम बंद पडले आहे. सदर कामाचा ठेकेदार व नगरपालिका प्रशासन यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. त्यातून मार्ग निघाला मात्र अद्याप डांबरीकरणाचे काम ठप्प आहे. डांबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र कधी नव्हे तो अनेक वर्षानंतर रोहिणी नक्षत्र कालावधीतच पाऊस सुरू झाला. चांदणी चौक लगत काँक्रिटीकरणाच्या कामासाठी अर्धा रस्ता गेले आठ दिवस खोदून ठेवलेला आहे. वाहनाची प्रचंड वर्दळ असल्याने हा रस्ता सध्या प्रवासासाठी जीव घेणा ठरत आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून प्रवासी व रहिवासी सुद्धा हैराण होत आहेत. या ठिकाणी अल्प कालावधीत अनेक वेळा अपघातही झाले, रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी येथील परिस्थिती आहे.अनेक जण रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडले, वाहनाचे नुकसान झाले. रस्त्यात चिखल, खोल खड्डे , साचलेले पाणी यामुळे प्रवासी, वाहन धारकामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून अर्धवट रस्ता कामाला जबाबदार कोण ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. राजकारण घाला चुलीत, पहिलं रस्त्याचं काम पूर्ण करा असा सवाल स्थानिक जनता करीत आहे. नगरपालिका प्रशासन म्हणते, रस्ता राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. स्थानिक अनेक पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या पूर्णत्वासाठी दहिवडी बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक अडचणी सांगितल्या. नगरपालिका प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही,. आम्ही त्यांना लेखी कळविले आहे असेही त्यांनी सांगितले. मात्र दोन प्रशासन विभागाच्या हेव्या दाव्यामध्ये सामान्य जनता भरडली जात आहे याबाबतचे भान कुणालाही राहिलेले नाही. या अर्धवट रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक अनेक पुढारी मूग घेऊन गप्प आहेत. मात्र अपूर्ण रस्त्याच्या कामावरून जनतेत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. या रस्त्यावरून जाणारे हजारो प्रवासी अक्षरशा मरणयातना सहन करीत आहेत . प्रवासी व स्थानिक रहिवाशांना सुलभ वाहतूक सुविधा देणारा म्हसवड चांदणी चौक व शिक्षक कॉलनी रस्ता भयानक चित्तरकथेत अडकला असून शेवटची मरण यातना सहन करीत आहे.
जनतेच्या अडी अडचणी सोडवणारे पोलीस स्टेशन कार्यालय याच रस्त्यावर असून अर्धवट रस्ता कामाचा फटका जनतेबरोबरच पोलिस यंत्रणेलाही बसत असल्याचे दिसून येत आहे.
या रस्त्याच्या कामाचा विचार करता प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे स्थानिक रहिवाशामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून प्रशासनावर कोणाचा अंकुश आहे का ? असा प्रश्न कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी व्यक्त केला आहे. रोज हजाbuरोंच्या पटीत प्रवास करणाऱ्या प्रवासी व स्थानिक जनतेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या रस्त्याचे काम प्रशासनाने न थांबवता तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी जनतेतूनही केली जात आहे.
[23/05, 12:08 pm] Babar Sir V. S.: म्हसवड चांदणी चौक येथील अर्धवट खोदलेला रस्ता