म्हसवड: म्हसवड परिसर आणि माण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित, क्रांतिवीर शैक्षणिक संकुल, म्हसवड यांच्या वतीने आयोजित केलेला संरक्षण सेवा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम उत्साहात संपन्न झाल
इंडियन एअर फोर्सचे विंग कमांडर संतोष शेडगे आणि माजी अप्पर विक्रीकर आयुक्त जीएसटी विलासराव इंदलकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर , उपाध्यक्ष अँड. इंद्रजीत बाबर, संस्था सचिव सुलोचना बाबर, अदानी ग्रुप ची जनरल मॅनेजर कांबळे , दिल्ली पोलीस उपनिरीक्षक उत्तम जाधव, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विंग कमांडर श्री. संतोष शेडगे यांनी विद्यार्थ्यांसाठी एनडीए,, सी. डी एस , आर आय एम सी ,सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा, एस पी आय. यांसारख्या व इतर संरक्षण सेवा परीक्षांच्या तयारीबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. संरक्षण दलातील करिअरच्या संधी, त्यासाठी आवश्यक असणारी शिस्त आणि तयारी याबद्दल त्यांनी तपशील निहाय माहिती दिली.
यावेळी बोलताना विंग कमांडर संतोष शेडगे म्हणाले आजच्या युवा पिढीत राष्ट्रप्रेम, शिस्त निर्मिती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी लष्करी सेवा ही काळाची गरज आहे . संरक्षण सेवेतील भरती, अभ्यास, नियोजन, शारीरिक क्षमता तयारी, संरक्षण सेवेतील मान,सन्मान,पेन्शन योजना, सामाजिक बांधिलकी देशप्रेम इत्यादी बाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनो तुम्ही इयत्ता नववी ते बारावी ही चार वर्षात भरपूर अभ्यास करा आणि पुढची चाळीस वर्षे सन्मानाने जगा. अन्यथा चार वर्षे मजा आणि पुढची चाळीस वर्षे सजा अशी विचित्र अवस्था तुमच्या वाट्याला येईल याबाबत वेळीच दक्ष रहा. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या जबाबदारीबद्दलही विंग कमांडर शेडगे यांनी माहिती दिली.
आजचे सत्कारमूर्ती गुणवंत विद्यार्थी हाच या संकुलाचा आरसा असल्याचे सांगून या संकुलास उज्वल भवितव्य असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना जीएसटी विभागाचे अप्पर आयुक्त विलासराव इंदलकर यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वेळेचं नियोजन, आत्मविश्वास आणि अभ्यासाचे सातत्य राखण्याचं महत्त्व पालक व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याकरिता पाया मजबूत करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शालेय स्तरावरच आपले नियोजन करून कामाला लागा. नेहमी सकारात्मक रहा, अवघड काहीही नाही. जिद्द आणि चिकाटी ठेवा. नेहमी मोठे स्वप्न ठेवून यशासाठी कष्टाची तयारी ठेवण्याचे आवाहन इंदलकर यांनी केले. पुढे बोलताना विलासराव इंदलकर म्हणाले स्पर्धेच्या जगात पुढे जाण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल शिक्षण प्रणाली तसेच कौशल्य युक्त शिक्षण आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. पालकांनी आपल्या अपेक्षा विद्यार्थ्यां वर न लागता त्यांच्या कलाने त्यांना पुढे जाऊ द्या असे सांगितले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील अद्यावत दर्जा, व्यवस्थापन व उपक्रमशील ते बद्दल त्यांनी विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या आणि एमबीबीएस ला प्रवेश मिळवलेल्या गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या मार्गदर्शन कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. हे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संरक्षण सेवा मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, प्राचार्य विठ्ठल लवटे, मुख्याध्यापक अनिल माने
यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सीबीएसई स्कूलचे समन्वयक अभिजीत सावंत यांनी व्यक्त केले.
