Advertisement

महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यावर अभ्यासक्रम सुरु करणार: कुलगुरु डॉ. महानवर


सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासनाची बैठक!

सोलापूर, दि. 4- महात्मा बसवेश्वर यांचे मानवतावादी कार्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचे कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन सल्लागार समितीची बैठक विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते.

यावेळी बैठकीत महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्यावतीने अल्पकालावधीचे विविध अभ्यासक्रम तयार करणे आणि हे अभ्यासक्रम सर्व इच्छुकांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन आणि विचारावर आधारित असलेली ग्रंथ संपदा संकलीत करुन कायमस्वरुपी जतन करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच ग्रंथाचे मराठी, कन्नड आणि इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर विश्वसंवाद सदन आणि महात्मा बसवेश्वर आयुर्वेदिक उद्यान निर्माण करण्यासाठी प्र-कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यावर आधारीत व्याख्याने, चर्चा, कार्यशाळा यांचे आयोजन करणे तसेच अध्यासन केंद्राच्या वतीने श्री सिध्देश्वर देवस्थान आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध संस्था महाविद्यालयासोबत सांमजस्य करार करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दिली

यावेळी जेष्ठ समाजसेवक हेमंत हरहरे यांनी सर्व उपक्रमाचे कौतुक केले व सामाजिक प्रबोधनासाठी अध्यासन कार्य करत असल्याचे नमूद केले. बैठकीला महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे सदस्य प्राचार्य गजानन धरणे, महादेव न्हावकर, स्वाती महाळंक, सुरेश शहापूरकर, राहुल पावले आदी उपस्थित होते.

फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन सल्लागार समितीची बैठक कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर.

बँक व्यवहार साक्षरता ही काळाची गरज-गौरव कल्याणकर


म्हसवड… प्रतिनिधी
शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना बँक व्यवहाराची माहिती गरजेची असून बँक व्यवहार साक्षरता ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी गौरव कल्याणकर यांनी म्हसवड येथे केले.
स्टेट बँक ऑफ इंडिया सातारा कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी गौरव कल्याणकर, प्रणव शिंदे तसेच म्हसवड शाखेचे मॅनेजर प्रशांत सुळ यांनी क्रांतिवीर इंग्लिश मिडियम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर,स्कूलचे प्राचार्य विन्सेंट जॉन, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गौरव कल्याणकर म्हणाले विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच बँकेच्या व्यवहाराची माहिती असणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार हा जीवनातील महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांना त्याची ओळख गरजेची आहे. यावेळी कल्याणकर यांनी अपघात विमा,एटीएम, आरटीजीएस, एनईएफटी, चेक, डीडी, ऑटो स्पेक फॅसिलिटी, म्युचल फंड, फोन पे,गुगल पे, इंटरनेट बँकिंग, शैक्षणिक कर्ज, पीक कर्ज, डेबिट कार्ड, मल्टिसिटी चेक सुविधा, बँक खाते उघडणे व त्यात किमान रक्कम ठेवणे इत्यादी बाबत माहिती दिली.
याबरोबरच उपस्थित शिक्षक व संस्था संचालकांना कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज बाबत सविस्तर माहिती दिली. या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक अभिजीत सावंत यांनी केले.

मायणी येथे बालचमुची पायी दिंडी

मायणी (प्रतिनिधी)—खटाव तालुक्यातील मायणी येथून अनेक अनेक पायी दिंड्या पंढरपूरला जातात त्यामुळे मैने परिसरात भक्तीमय वातावरण तयार होते येथील स्फूर्ती शिक्षण मंडळ संचलित अनंत इंग्लिश स्कूल व हुतात्मा भगतसिंग प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी खांद्यावर पताका, हातात टाळ, व विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा घेऊन ज्ञानेश्वर माऊली तुकाराम च्या जयघोषात दिंडी

काढली दिंडी शाळेपासून निघून जिथून यशवंत बाबाची पालखी पंढरीला जाते त्या यशवंत बाबाच्या मंदिरापर्यंत पायी चालत दिंडी काढली या दिंडीमध्ये स्फूर्ती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव येळगावकर, त्यांच्या सुविध्य पत्नी डॉक्टर सौ उर्मिला येळगावकर, मुख्याध्यापक दीपक खलीपे, दुसरे मुख्याध्यापक सुनील यलमर, तसेच शिक्षक, महिला शिक्षक, अन्य कर्मचारी, यांनी भाग घेतला या दिंडीमुळे संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते

शुक्रवारी खटाव तालुक्यात फेर सरपंच आरक्षण सोडत

औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे

खटाव तालुक्यातील १३३ ग्रामपंचायतीची सरपंच आरक्षण सोडत शुक्रवारी दि. ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वडूज येथील पंचायत समितीच्या बचत सभागृहात आयोजित केल्याची माहिती तहसीलदार बाई माने यांनी दिली.


याबाबत संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी यांनी सरपंच पदाचे आरक्षण सोडतीची जाहीर प्रसिद्धी गावात दवंडी देऊन करावी तसेच ग्रामपंचायतीच्या व पंचायत समिती खटाव, (वडूज) च्या नोटीस बोर्डवर लावण्यात यावी त्याचप्रमाणे सरपंच आरक्षण सोडतीचा अहवाल समक्ष सादर करण्याचे आव्हान तहसीलदार बाई माने यांनी केले आहे.
यापूर्वी २३ एप्रिल रोजी खटाव तालुक्यातील १३३ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाली होती. मात्र शासन निर्णयानुसार इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणात बदल झाल्यामुळे पुन्हा नव्याने शुक्रवारी दि. 4 रोजी सकाळी 11 वाजता वडूज येथील पंचायत समितीच्या बचत सभागृहात सरपंच आरक्षण सोडत होणार आहे.

error: Content is protected !!