लोणंद (प्रतिनिधी)- आजच्या काळात दुर्मिळ असलेला प्रामाणिक माणूस हरवत चालला आहे, मात्र सचाईचे जीवन जगणारे प्रामाणिक लोक आहेत हेच या घटनेतून दिसून येते आहे. कोणत्या प्रकारची अपेक्षा न करता सापडलेली पैशाची पर्स व सोने परत करणाऱ्या फ्रिदा कच्छी यांचा लोणंद पोलीसांनी सत्कार केला आहे.
सापडलेली पर्स मालकिणीपर्यंत पोहोचवणाऱ्या सौ. फरीदा कच्छी यांचा पोलिसांकडून विशेष सत्कार करण्यात आला.
पालखीतळ, लोणंद येथे आज एक अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी घटना घडली. नगरपंचायत गळ्यामधील सौ. फरीदा सुलेमान कच्ची यांना त्यांच्या दुकानात सौ. अश्विनी दत्तात्रेय नरुटे (रा. कुसुर, ता. फलटण, जि. सातारा) यांची पर्स आढळून आली. सदर पर्समध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महत्वाची कागदपत्रे होती.
सौ. फरीदा कच्छी यांनी कोणतेही मोह न ठेवता, अतिशय प्रामाणिकपणे ती पर्स लोणंद पोलीस ठाण्यात जमा केली. त्यानंतर लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी तातडीने सौ. अश्विनी नरुटे यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि सर्व वस्तू व दस्तऐवज सुरक्षितपणे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या प्रामाणिक आणि समाजासाठी प्रेरणादायी वर्तनाबद्दल लोणंद पोलीस विभागातर्फे सौ. फरीदा कच्छी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रामाणिकतेचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.ही घटना समाजात चांगुलपणाचे आणि निस्वार्थ वर्तनाचे आदर्श उदाहरण ठरली असून, अशा व्यक्तींमुळेच समाजात विश्वास टिकून राहतो, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे..