माणदेशी न्यूज नेटवर्क – म्हसवड
माण तालुक्यातील हिंगणी गावात बुधवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना हिंगणी गावच्या हद्दीत असलेल्या आसळओढा परिसरातील घुटूकडे वस्ती येथे घडली. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास आनिता बंडु घुटूकडे या महिला आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. तर त्याच घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचे पती बंडु अंकुश घुटूकडे (वय ४०) यांनी रबरी बेल्टच्या साहाय्याने पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले.
प्राथमिक माहितीनुसार, बंडु घुटूकडे यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या डोक्यात लाकडी दांडा असलेल्या लोखंडी घनाने प्रहार करून तिचा खून केला. त्यानंतर त्यांनी स्वतः विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांनी भेट दिली. यावेळी, ठसे तज्ञ पथक आणि श्वानपथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मरणाचा मेहुणा ज्ञानेश्वर वस्ताद झिमल (वय ३१) यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे हिंगणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

