सहा महिन्यांत १४६ कोटी ६७ लाखांची व्यवसायवाढ- संस्थापक रामभाऊ लेंभे
पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी,/अभिजीत लेंभे पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने ८ विभागीय कार्यालयांचे माध्यमातून ५६ शाखाविस्तार करीत सर्वांचा विश्वास संपादन केला आहे.संस्थेने दि.३० सप्टेंबर २०२५ अखेर १५०० कोटी एकत्रित व्यवसायाचे सिमोलंघन करीत अतिशय चांगले काम करून १५०५ कोटी ८५ लाख एकत्रित व्यवसाय केला आहे अशी माहिती संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी संस्थेचे मुख्यालय पिंपोडे बुद्रुक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांचा कल ओळखून छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची कामकाजाची चांगली घडी बसली असून सर्व शाखा संगणकीकृत,सीबीएस प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना डिजिटल सेवा,आरटीजीएस,एनईएफटी,आयएम पीएस मोबाईल बॅंकिंग सुविधा देऊन गतीमान व पारदर्शक सेवा दिली जात असल्याने ग्राहकांचा वेळ वाचत आहे व दफ्तरी कामकाजात वेळ जात नाही.सुरक्षित गुंतवणूक व नियमानुसार कर्जवाटप यामुळे मार्च २०२५ नंतर ३० सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांत १४६ कोटी ६७ लाख व्यवसायवाढ झाली आहे.याचे श्रेय दूरदर्शी संचालक मंडळ, मार्केटिंग व ग्राहकांना तत्पर सेवा देणारा प्रशिक्षित सेवक वर्ग यांना जाते असे सांगून संस्थापक रामभाऊ लेंभे म्हणाले,मार्चनंतर पतसंस्थांच्या कारभारात शिथीलता येते,ठेवी कमी होतात, शेतकऱ्यांना पावसाळ्यामुळे उत्पन्न नसते,मुलांचा शैक्षणिक खर्च वाढतो.अशा मंदीच्या काळातही छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने अतिशय चांगले काम करीत गत सहा महिन्यांत केलेली चांगली व्यवसायवाढ पहाता येत्या सहा महिन्यांत १५० कोटींचा व्यवसाय वाढून व या सहकार वर्षात ३०० कोटींचा व्यवसाय वाढेल यात शंका वाटत नाही.संस्थेने गतवर्षी सुरू केलेल्या उलवे ता.पनवेल,जि.रायगड येथील शाखेने एका वर्षात १० कोटींचा व्यवसाय केलेला आहे.तेथील जनतेचा वाढता प्रतिसाद पहाता लवकरच तेथे स्वमालकीचे जागेत संस्थेची दुसरी शाखा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.