किरकोळ कारणावरून मांडवे येथील युवकावर हल्ला
तडवळे प्रतिनिधी – श्री जे.के. काळे
मांडवे (ता. खटाव) येथील देशमुख वस्तीवरील विश्वजीत जयवंत देशमुख याच्यावर दहिवडी येथील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला.
हा प्रकार घडताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी पांढऱ्या व काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून येऊन देशमुख यांच्या घरात घुसले. त्यांनी फायबरच्या दांड्याने असलेले लोखंडी खोरे, लोखंडी गज, लाकडी दांडके यांचा वापर करून विश्वजीतच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर व पायावर मारहाण केली.
हल्ल्याच्या वेळी त्यांचे काका अशोक देशमुख व काकू प्रमिला देशमुख यांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली.
याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद अशोक गुलाबराव देशमुख यांनी दिली आहे.
या तक्रारीनुसार आरोपी प्रथमेश धन्यकुमार जमादार (रा. परकंदी, ता. माण), तुषार केशव शेळके (रा. शिरवली, ता. माण) तसेच अनोळखी ४-५ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कायदा २०२३ अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार अमित शिंदे करत आहेत.