बार्शी: प्रतिनिधी
शिक्षक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.समाजाची घडी व्यवस्थित बसावी यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांच्या कार्याचा गौरव समाजासाठी भूषणावह आहे, असे मत बार्शी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री. अशोक सायकर यांनी व्यक्त केले.जनस्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, हडपसर, पुणे यांच्या वतीने बार्शी येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून श्रीमती ज्योती फतेहचंद शाह यांची उपस्थिती लाभली. जनस्वराज्य फाउंडेशनचे संचालक श्री दशरथ उकिरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.जनस्वराज्य फाउंडेशनमार्फत घेण्यात येणाऱ्या विविधांगी कार्यक्रमांची त्यांनी रूपरेषा मांडली. याप्रसंगी श्री शिवाजी महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्रा.डॉ. राहुल पालके यांचा शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरव करण्यात आला. पालके यांनी ५ विषयात १९ वेळा नेट / सेट ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच त्यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सहभाग असतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पुढे बोलताना अशोक सायकर यांनी शिक्षकांच्या समाजातील योगदानाबद्दल मत मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हितासाठी काय करावे याचाही ऊहापोह केला.शिक्षकांनी काजव्यासम आपल्या कार्याने चमकत राहावे असाही संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाह यांनी समाजातील शिक्षकांचे स्थान व भूमिका याबाबत आपले मत मांडले. तसेच समाजातील शिक्षकांचे स्थान उंचावण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.फाउंडेशनचे अध्यक्ष दशरथ उकिरडे यांनी शिक्षकांचा गौरव करून सामाजिक बांधिलकी जोपासली. याप्रसंगी बार्शी तालुक्यातील शिक्षिका यांना सन्मानित करण्यात आले. यात श्रीमती अपेक्षा विजयसिंह निचळ, जि.प. शाळा, सौंदरे, श्रीमती प्रवीण संदेश कांदे,जि.प. शाळा, बाभूळगाव,श्रीमती वर्षा देविदास भांगे,
जि.प. शाळा, चिखर्डे, श्रीमती रूपाली रघुनाथ बिडवे,.जि.प. शाळा,शेळगाव (आर) यांचाही समावेश आहे.शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जनस्वराज्य फाउंडेशनच्या वतीने त्यांचा यथोचितपणे सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रकाश पवार, शैलेश वखारिया, विनोद कबाडे, अमृता रंगदाळ, हनुमंत गोटे, सन्मानार्थींचे नातेवाईक उपस्थित होते.
प्रा.डॉ. राहुल पालके यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान