म्हसवड :
मानवतेचा, बंधुतेचा आणि सेवा भावनेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त म्हसवड शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने भगवान गल्ली येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



शिबिराचे उद्घाटन माण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी, सपोनि अक्षय सोनवणे, हृदयविकार तज्ञ डॉ. प्रमोद गावडे, अस्थिरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब दोलताडे, नेत्ररोग तज्ञ डॉ. निखिलेश शेटे (पिलीव), ऑप्टोम.- इरफान काझी (नेत्र तंत्रज्ञ), दंतरोग तज्ञ डॉ. सौरभ दोशी, पत्रकार विठ्ठल काटकर, अहमद मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनावेळी बोलताना डॉ. कोडलकर म्हणाले की सन ५७० मध्ये मक्का येथे जन्मलेले पैगंबर साहेब हे केवळ इस्लाम धर्माचे संस्थापक नसून संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक होते. त्यांच्या शिकवणी आजही समाजाला नवी दिशा दाखवत आहेत. नितीनशेठ दोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पैगंबर मुहम्मद यांनी सत्य, संयम, दया, बंधुता आणि ईमानदारीचा मार्ग दाखवला. त्यांनी शिकवलेले विचार आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहेत. डॉ. प्रमोद गावडे यांनी व्यक्त केले की या शिबिरातून पैगंबरांच्या जयंतीनिमित्त मानवतेची आणि सेवा भावनेची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे. सपोनि अक्षय सोनवणे यांनी म्हसवड शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कौतुक करत सांगितले की येथील बांधव कोणताही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्व धर्मांचे सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात. शहर काझी इर्शाद काझी यांनी पैगंबरांचे जीवन व शिकवण याविषयी सविस्तर माहिती दिली आणि या शिबिरातून समाजातील सर्व घटकांना प्रत्यक्ष लाभ होणार असल्याचे सांगितले.
आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांनी रक्तदाब, हृदयविकार, नेत्र तपासणी, हाडांची तपासणी तसेच दंतरोग तपासणी करून घेतली. रुग्णांना मोफत औषधे वाटण्यात आली. चालता न येणाऱ्या वृद्धांना स्टीलच्या काट्याही देण्यात आल्या.
शुक्रवारच्या नमाज पठणानंतर सर्व मुस्लिम बांधवांच्या सहभागातून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. लहान मुलांनी नाथ म्हणत घोषणा दिल्या. मिरवणूक काझी गल्लीमार्गे अमीना मस्जिद येथे पोहोचली. यावेळी मुलांना खाऊ व बक्षिसे वाटण्यात आली तसेच सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे पैगंबरांच्या जयंतीनिमित्त सेवा, ऐक्य व मानवतेचा सुंदर संदेश समाजात पोहोचल्याची भावना व्यक्त होत आहे.