
गोंदवले,ता.२० : घरातूनच शेती विषयाचे बाळकडू मिळालेल्या डॉ.प्राजक्ता दिनकर फडतरे-देशमुख (कर्पे-पाटील) यांनी कृषी आचार्य होण्याची जिद्द पूर्ण केलीय.अकोल्याच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातुन त्यांनी नुकतीच पीएचडी पदवी मिळवली आहे.त्यांच्या या यशाने गोंदवल्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.
पूर्वीपासूनच नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतीमध्ये यश मिळविलेल्या फडतरे-देशमुख कुटुंबातील दिनकर फडतरे-देशमुख हे कृषी विभागात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत कन्या डॉ.प्राजक्ता यांनी देखील कृषी क्षेत्रात भरारी घेतलीय.
बालपणी कृषी क्षेत्राचे बाळकडू मिळाल्याने त्यांचे याच क्षेत्रातुन शिक्षण घेऊन उच्च पदस्थ अधिकारी होण्याचं स्वप्न होते.बारावी नंतर त्यांनी डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली येथून बी टेक कृषी अभियांत्रिकी व एम टेक अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी या विषयांचा अभ्यास यशस्वीपणे पूर्ण केला.परंतु एवढ्यावरच न थांबता त्यांनी कृषी विभागातील सर्वोच्च पदवी मिळविण्यासाठी धडपड सुरू ठेवली.त्यासाठी त्यांनी सन २०२४ मध्ये सादर केलेल्या
अपारंपरिक ऊर्जा कृषी अभियांत्रिकी या प्रबंधाद्वारे संशोधन करून कृषी जैव अवशेष जसे की कापूस कांड्या,तूर कांड्या आणि सोयाबीन भुसा यापासून उच्च प्रतीचा बायोचर बनवण्याचे यंत्र विकसित केले.या संशोधनातून शेती व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त लाभ होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.या संशोधनाची दखल घेऊन अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यांना नुकतीच पीएचडी पदवी बहाल केली आहे.अकोला येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, कामगारमंत्री आकाश फुंडकर,कर्नाटक कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ.अशोक दलवाई यांच्या हस्ते नुकतीच ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली.या संशोधनासाठी डॉ.प्राजक्ता यांना डॉ.सुरेंद्र काळबांडे यांचे मार्गदर्शन मिळाले.