साताऱ्यात महामार्ग उड्डाणपुलाला डॉ. आंबेडकर असे नामकरण करून जयंती साजरी

Spread the love


(अजित जगताप )
सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरातील प्रवेशद्वारा नजीक असलेल्या विलासपूर येथील अजंठा चौकातील राष्ट्रीय महामार्गाला विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल अजंठा चौक असे नामकरण फलक आज डॉ. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ यांच्या हस्ते लावण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात युगपुरुषांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या सातारा- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील विलासपूर गावच्या हद्दीतील देगाव फाटा या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाला विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल अजिंठा चौक असा ऐंशी बाय पाच फुटाचा भव्य नाम फलक दोन्हीही बाजूला लावण्यात आला. यामुळे खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाल्याचा दलित कष्टकरी शोषित समाजाला आनंद झाला आहे.
सातारा शहरातून महामार्गावर वाडे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट आणि विलासपुर गावच्या हद्दीतील देगाव फाटा असे तीन उड्डाणपूल आहेत. यापैकी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलाला छत्रपती प्रतापसिंह महाराज उड्डाणपूल आणि वाडे फाटा येथे विकासरत्न अभयसिंहराजे भोसले महाराज उड्डाणपूल असे यापूर्वीच नाव देण्यात आलेले आहे. या तीनही युगपुरुषांचे मोठे योगदान समाजासाठी आहे.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन कामगार आघाडीचे नेते मदन खंकाळ व कार्याध्यक्ष रामभाऊ मदाळे आणि वाहतूक आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र तथा नानासाहेब ओव्हाळ आणि युवकांचे प्रेरणास्थान विजय ओव्हाळ, आनंद तथा बाबा ओव्हाळ, युवक अध्यक्ष अतुल कांबळे, अविनाश पवार, मीर खंकाळ, निखिल गायकवाड, समाधान कांबळे, समाधान जावळे, अमोल कांबळे आधी कार्यकर्त्यांनीही नाम फलक लावण्यासाठी सहकार्य केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण हे सातारा शहरात सातारा हायस्कूल व सदर बाजार कॅम्प या ठिकाणी वास्तव्य झाल्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. या नाम फलकाच्या अनावरणानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवाद्यांना या वेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ए गटाचे राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे, महाराष्ट्राचे अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, संतोष नलावडे व सलीम बागवान व आनंद गाडीवडार ,सुरेश पवार यांनी शुभेच्छा दिलेले आहेत.
आज सोमवार १४ एप्रिल निमित्त सातारा शहर परिसरात विविध कार्यक्रम होणार आहे. साताऱ्यात भीम फेस्टिवल, पदयात्रा, भव्य मिरवणूक आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वीर लहुजी वस्ताद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विविध मान्यवरांचे अभिवादन असा कार्यक्रम होत आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढू लागलेली आहे. सर्व समाज बांधव या जयंतीनिमित्त सामील झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
या निमित्त शालेय साहित्य वाटप तसेच गरिबांना गणवेश वाटप व अल्पोहार आणि शीतपेय मोफत देण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. सरिता मदाळे, मीना खंकाळ, मोहिनी खंकाळ, समाधान भालेराव यांच्यासह विविध महिला बचत गट महिला मंडळ आणि भीम गीते सादर करणाऱ्या क्रांतिकारी गायक यांनीही सहभाग घेतला होता. त्यांची आतिषबाजी व घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.


फोटो- सातारा शहरात नाम फलकाचे अनावरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी (छाया- अजित जगताप सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!