शेतकरी हितासाठी लढल्याबद्दल झाला गौरव…

वडूज : महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांचा पुण्यात नुकताच गौरव करण्यात आला. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित एका मान्यवर समारंभात ‘संघर्ष योद्धा पुरस्कार’ जाहीर करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराद्वारे त्यांच्या कर्तव्यदक्ष नेतृत्वगुणांचा, निष्ठावंत वृत्तीचा आणि शेतकरी हितासाठी केलेल्या सततच्या प्रयत्नांचा गौरव करण्यात आला आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते हा पुरस्कार अनिल पवार यांना देण्यात आला.
संघर्ष योद्धा पुरस्कार हा त्या व्यक्तीला दिला जातो जे आपल्या क्षेत्रात विविध अडचणींना तोंड देत समाजासाठी अथकपणे कार्य करतात. अनिल पवार यांचे नेतृत्व तसेच त्यांचा सामाजिक बांधिलकीचा, निष्ठावंत वृत्ती आणि शेतकरी लढ्यासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे, असे गौरव उद्गार बच्चू कडू यांनी काढले. कृषी क्षेत्रातील समस्यांना समजून घेऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विविध राज्यस्तरीय मंचांवर आवाज उठविला आहे. तसेच, त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या आसपासच्या युवकांना, चळवळीला अनेकदा प्रोत्साहन मिळाले आहे.
पवार यांच्या चळवळीतील कार्यामुळे स्थानिक पातळीवर शेतकरी व युवक यांना शेतीतील अनेक प्रयोगासाठी संधी मिळून आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून बळकटी मिळाली आहे, त्यामुळे पहिला पुरस्कार अनिल पवार यांना दिला आहे, महादेव जानकर म्हणाले.
अनेक वेळा शेतकरी उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे. तसेच, त्यांनी शेतकरी बांधवांच्या समस्या सरकारसमोर ठेवत त्यासाठी उपाययोजना करण्यास अनेकदा मदत केली आहे. त्यांच्या संघर्षामुळे अनेक युवक शेतकरी राजकारणात आणि समाजकार्यांत सक्रिय झाले आहेत. “अनिल पवार हे खऱ्या अर्थाने संघर्ष करणारे आणि समर्पित नेतृत्व आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक युवकांना दिशा मिळाली आहे.” असे राजू शेट्टी म्हणाले. त्यांच्या या सन्मानाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.