वाठार स्टेशन….
फलटण-कोरेगावमध्ये राजकीय रणधुमाळी: वाघोलीतील कार्यक्रमात रामराजेंनी आमदार सचिन कांबळेंना खरपूस सुनावलं!
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि विद्यमान आमदार सचिन कांबळे पाटील यांच्यात वाकयुद्ध चांगलेच रंगताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार सचिन कांबळे पाटील यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात रामराजेंवर सडकून टीका केली होती.
या टीकेला सडेतोड उत्तर देताना, रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोरेगाव तालुक्यातील वाघोली गावातील एका कार्यक्रमादरम्यान आपली भूमिका मांडली. आपल्या भाषणात त्यांनी कांबळे पाटलांचे नाव घेतले नसले, तरी टीकेचे बाण नेमके कुणाकडे रोखले आहेत, हे श्रोत्यांच्या लक्षात यायलाच वेळ लागला नाही.
“सत्तेत असताना लोकांना विसरणं आणि निवडणुकीआधी पुन्हा गोड गोड बोलणं, हा प्रकार इथल्या जनतेला नवीन नाही,” असे म्हणत रामराजेंनी सध्याच्या नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्यांच्या या खरपूस भाषणानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, मतदारसंघातील वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. आता पाहावं लागेल की आमदार सचिन कांबळे पाटील यावर काय प्रत्युत्तर देतात.