म्हसवड शहरात विजेचा लंपडाव सुरु, विज ग्राहक म्हणतायेत काय करु
|

म्हसवड( -महेश कांबळे)—
म्हसवड शहर व परिसरात गत काही दिवसांपासुन विजेचा लंपडाव सुरु झाल्याने सामान्य जनता पुरती हैरान झाली आहे, मात्र याबाबत विज कंपनी संवेदनशिल नसल्यानेच विज ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे, याबाबत विज कंपनी ला कोणी जाब विचारणाराच नाही अशी धारणा या विभागाची झाली असल्यानेच विज कंपनीचा मनमानी कारभार सुरु आहे.
विज कंपनी अन् येथील झिरझिर पाऊस यांचे एक वेगळेच नाते आहे या परिसरात जरा जरी पाऊस आला म्हटले की लगेचच शहर व परिसरातील बत्ती गुल होत असल्याचे आजवर पहावयास मिळाले आहे. ही परिस्थिती बदलावी अथवा अशी वेळच येवु नये अशी आजवर कधीच विज कंपनीच्या कोणत्याच अधिकार्यांना वाटले नाही त्यामुळे वारंवार विज जाण्याची जणु येथे एक प्रथाच पडली आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये, या उलट जर एखाद्या विज ग्राहकाने आपले विज बील थकवले तर लगेचच त्याच्यावर कारवाईचा बडगा या कंपनीकडुन केला जात आहे. सध्या उकाड्याने सामान्य जनता हैरान झालेली आहे अशावेळी अवकाळी पाऊसाचे नुसते वातावरण जरी निर्माण झाले तरी येथे बत्ती गुल होत असल्याचे चित्र आहे, वारंवार बत्ती गुल होण्याने सर्वसामान्य जनता पुरती हैरान झाली आहे. विज कंपनी ला कोणी जाब विचारत नसल्याने ग्रामीण जनतेचे हाल सुरु आहेत. वारंवार विज जाण्याने छोट्या व्यावसायिकांचे व शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहे याकडे कोणीही गांभीर्याने पहात नाही. नेतेमंडळीही याबाबत मौन पाळुन असल्याने मस्त चालंलय आमचे असेच विज कंपनी चे अधिकारी म्हणत असावेत आपल्याला ना कोणी बोलणारे ना जाब विचारणारे अशी यांची धारणा झाल्यानेच विज जावो अथवा राहो याबाबत विज कंपनी चा कोणताच अधिकारी गंभीर नाही. ग्रामीण भागात तर विज गेल्यावर तब्बल १२ /१२ तास बत्ती गुल होत आहे. ग्रामीण भागात जनता राहते याचाच विसर या कंपणीला पडलेला दिसत आहे, मात्र ग्रामीण जनतेचा या कंपणीच्या अधिकार्यांनी अंत पाहु नये अशी परिस्थिती राहिल्यास हीच ग्रामीण जनता विज कंपनी ला एक दिवस मोठा झटका देईल एवढे मात्र नक्की.
चौकट –
विज गेल्यावर कर्मचारी स्पॉटवर अधिकारी रुमवर –
सध्या अवकाळी पाऊसाचे दिवस असल्याने वारंवार विज ट्रिप होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशावेळी ज्याठिकाणी घोटाळा झाला आहे त्याठिकाणी भर पाऊसात व अंधारात विज कर्मचारी काम करताना दिसतात त्यांच्याकडे पुरेशा सुविधा अथवा सुरक्षा कवच ही नसते तरी ही ते जीव धोक्यात घालुन काम करताना दिसतात मात्र अशावेळी त्यांचे अधिकारी रुमवर बसुनच आढावा घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
स्मार्ट मिटरला विज ग्राहकांचा होतोय तीव्र विरोध –
सध्या विज कंपनी कडुन विज ग्राहकांना स्मार्ट विज मिटर दिले जात आहे नव्हे तर त्या ग्राहकाच्या इच्छेविरुध्द ते बसवले जात आहेत, या स्मार्ट मिटरबाबत विज ग्राहकांच्यामध्ये साशंकता असल्याने त्यांच्याकडुन या स्मार्ट विज मिटर ला विरोध होत आहे, मात्र तरी ही कंपनीकडुन असे मिटर बसवण्याचे काम काही ठिकाणी सुरुच आहेत, असे मिटर ज्या ग्राहकांना देण्यात आले आहेत त्यांना आलेले विजबील पाहुन त्या ग्राहकांचे डोळे पांढरे होत असल्यानेच त्या स्मार्ट मिटरला सामान्य विज ग्राहकातुन विरोध होताना दिसत आहे.
फोटो –