म्हसवड… प्रतिनिधी
आजची युवा पिढी सोशल मीडियाच्या व्यसनाधीनतेमध्ये ओळखली असताना दुसऱ्या बाजूला
वर्तमानपत्र वाचन संस्कृती अखंडपणे जोपासणाऱ्या तसेच सूचक वाचन करणाऱ्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान नुकताच म्हसवड येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आजची युवा पिढी मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेलेली आहे. मात्र अशाही बदलत्या जमान्यात काही वयोवृद्ध ज्येष्ठांनी आपला वर्तमानपत्र वाचण्याचा नियमित व अखंड छंद अनेक वर्षापासून जोपासला आहे. यापैकीच ज्येष्ठ वाचक मारुती बाबू शिंदे राहणार म्हसवड वय फक्त 96 व तुकाराम विष्णू बाबर राहणार देवापूर वय 90 यांच्या वाचन छंदाची दखल घेऊन क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, ज्येष्ठ बागायतदार तुळशीराम गोरड, व्यावसायिक पो पट गोंजारी, व सतीश पवार यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. विशेष म्हणजे दोघांचे वय 90 च्या पुढे मात्र डोळ्याला चष्मा नाही. त्यांचा वाचनाचा छंद अनेक तपापासून सुरू असून आजही ते विविध वर्तमानपत्र रोखीने रोजच्या रोज पैसे देऊन विकत घेऊन त्याचे वाचन वेळ मिळेल तसे दिवसभर करतात. एक वेळ चहा व जेवण नाही मिळाले तर चालेल पण वर्तमानपत्र वाचण्याचे सोडत नाही. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण छंदा बाबत या ज्येष्ठांनी आवर्जून नित्यनियमाची तपशीलवार माहिती सांगितली . दोघांची प्रकृती खैराच्या लाकडासारखी खणखणीत, आजारपण आमच्याकडे डोकावले सुद्धा नाही . इंजेक्शन गोळ्या घेतल्याचे आठवत सुद्धा नाही. चुकून ताप, कणकणीची चाहूल लागलीच तर हुलग्याचं माडगं पिऊन घोंगडं पांघरून झोपणे. रोख पैसे खर्च करून नियमितपणे वर्तमानपत्र वाचणाऱ्या तसेच वाचन संस्कृती जोपासणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान करण्याची दूरदृष्टी कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी दाखविल्याने हा विषय वैशिष्ट्यपूर्णरित्या चर्चेचा झालेला आहे.
छंद वाचनाचा,वयोवृद्ध वाचक नागरिकांचा सन्मान