उमरगा (ता. २६) येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दिनांक 2६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन घटना समितीने स्वतंत्र भारतासाठी तयार केलेले संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकृत केले. याच संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता या संवैधानिक मूल्यामुळेच भारताचे अखंडत्व टिकून आहे, त्यामुळे प्रत्येकाने संवैधानिक मूल्यांचे संवर्धन करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले.
महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी आणि करियर कट्टा विभागाच्या वतीने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते.
यावेळी संविधान दिनानिमित्त भारत मातेला वंदन आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ अस्वले, स्टेट बँक ऑफ इंडिया नांदेड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसचे चीफ मॅनेजर शशिकांत फडताळे आणि उमरगा शाखेचे शैलेश बिराजदार यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे, प्रा. शैलेश महामुनी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुनील बिराजदार आदी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या उद्देशपत्रिकेच्या एक हजार प्रतीचे वाटप सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले.
पुढे बोलताना प्राचार्य संजय अस्वले म्हणाले की भारतासारख्या विशाल भूप्रदेशांमध्ये विविधता असणाऱ्या समाजाला एकत्र टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये केल्या आहेत. त्यामुळेच देशातील विविध प्रांतात भाषा, संस्कृती, धर्म हे वेगवेगळे असले तरी या सर्व समूहांना आम्ही भारताचे नागरिक या नात्याने एकत्र ठेवण्यासाठी आम्हाला यश आले आहे. तेव्हा प्रत्येक भारतीय नागरिकाची ही जबाबदारी आहे की आपण संवैधानिक मूल्यांची जपणूक केली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अनिल देशमुख यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरिधर सोमवंशी यांनी भारत हा जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश असून या देशातील लोकशाहीच्या यशस्वीतेचे सर्व श्रेय हे भारतीय संविधानालाच द्यावे लागेल असे प्रतिपादन केले. हा देश कुठल्याही धर्मग्रंथाच्या आधारावर चालत नसून तो संविधानानुसार चालतो त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकांनी संविधानातील तरतुदींची माहिती करून घेतली पाहिजे तसेच गावागावात संविधानाचे पारायण झाले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी . बी. ढोबळे यांनी केले तर प्रा. समाधान पसरकल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. डी .एस. चिट्टमपल्ले, डॉ . भारत शेळके, प्रा. मुरली जाधव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.