
म्हसवडच्या कन्येचा गावाचा मान वाढवणारा पराक्रम; नितिनभाई दोशी यांच्या हस्ते शाल, तिरंग्याची प्रतिकृती व भेटवस्तू प्रदान
.
अहिंसा पतसंस्थेच्या वतीने तेजल प्रज्योत दोशीचा सत्कार
म्हसवड वार्ताहर –
म्हसवड नगरीच्या कु. तेजल प्रज्योत दोशी हिने चार्टर्ड अकाउंटंट (CA) या कठीण व प्रतिष्ठेच्या परीक्षेत यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी अहिंसा पतसंस्थेतर्फे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे कुटुंबप्रमुख व म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांच्या हस्ते कु. तेजल हिला तिरंग्याची प्रतिकृती, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. समारंभात बोलताना नितिनभाई दोशी यांनी सांगितले की, “CA सारखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून, शिस्त, कठोर परिश्रम आणि ध्येयवेड लागते. तेजलने हे सर्व गुण आत्मसात करून संपूर्ण कुटुंब व गावाचा अभिमान वाढवला आहे.”
कु. तेजल हिने या यशाचे श्रेय आपल्या पालकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण परिश्रमांना दिले. ती पुढे व्यावसायिक क्षेत्रात उच्च शिखरे गाठून समाजासाठी योगदान देण्याचा निर्धार बाळगून आहे.
या कार्यक्रमाला तेजलची आई दीपाली दोशी, आजोबा सुरेश गांधी, मामा सचिन गांधी तसेच संस्थेचे व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी व गावातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी तेजलच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
….