
सातारा दि: सातारा तालुक्यातील भरतगाववाडी येथील ३२ ग प्रकरण प्रलंबित ठेवणे. बेकायदेशीर फेरफार नोंदी करणे तसेच कुळाचे नाव काढून टाकणे. आणि चुकीच्या पत्त्यावर पत्रव्यवहार केल्यामुळे डॉक्टर विजया संपत जगताप या उच्चशिक्षित महिलेवर गेले दोन दिवसांपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे.
याबाबत त्यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. भरतगाववाडी येथील गट क्रं. ६३६ व गट क्रं. १४५ या जमिनीचे बाबुराव तुकाराम जगताप (चिकाटे) हे मूळ कुळ होते, त्यांचे वारस विजया संपत जगताप आहेत. सदरच्या जमिनीचे साठेखत करून त्यांना दमदाटी केली जात आहे. जमीन बळकावण्यासाठी काही राजकीय नेते व शासकीय अधिकारी दबाव आणत आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे फेरफार नंबर १७२३ आहे. असही त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे.
गेली दहा ते बारा वर्षे त्या पत्रव्यवहार व कायदेशीर बाजू मांडून जमीन वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सातारा तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १५५ प्रमाणे रेकॉर्ड दुरुस्तीसाठी एका व्यक्तीने अर्ज केला होता . त्या अर्जाची तारीख १२ एप्रिल २०२४ असून त्याच दिवशी मंडलाधिकारी, शेंद्रे यांनी संबंधित व्यक्तीचा जवाब नोंदविला आणि सातारा तहसीलदार यांनी बारा तासातच दुरुस्तीबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. एवढी तत्परता इतर कोणत्याही अर्जावर अद्याप झालेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीपासून वंचित ठेवले जात आहे या त्यांच्या आरोपाला बळकटी मिळत आहे असा त्यांनी दावा केला आहे.
सदर जमिनीच्या मूळ मालक व त्यांच्या वारसदारांची नोंद आहे. त्यांची वहिवाट असल्याचे नमूद केले आहे असे असताना मूळ मालकाचे नाव फेरफार क्रमांकाने कमी करण्यात आले आहे. सध्या काही प्रकरण न्यायप्रविष्ठ व प्रलंबित आहेत. हे जरी खरं असलं तरी फेरफार नंबर १७२३ च्या प्रकरणात अर्जदार यांचा राहण्याचा पत्ता हा मोकळ्या जमिनीचा पत्ता टाकण्यात आला आहे जेणेकरून या पत्त्यावर कोणीही संपर्क साधू नये अशी तजवीज केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गेली बारा वर्ष या जमिनीबाबत ते पाठपुरावा करत असून ३२ ग प्रकरण म्हणजे दोन राज्याचा सीमावाद असल्याचे आता प्रशासन समजत आहे का? असे यातून दिसून येत आहे. डॉक्टर विजया जगताप या उच्चशिक्षित असून त्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. सदर प्रकरणाचीची सत्यता पडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल जोपर्यंत प्रामाणिकपणाने सादर होत नाही तोपर्यंत सदर महिलेचे समाधान होणार नाही. मूळ कागदपत्र व सत्य परिस्थिती याची तपासणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा जो जिल्हा प्रशासनाला कार्यक्रम दिलेला आहे त्या कार्यक्रमाची शपथ घेऊन याप्रकरणी तोडगा काढावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे. सदर महिलेवर उपोषणाची वेळ येणे हे लोकशाहीसाठी घातक आहे याची जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी होऊ लागलेली आहे. दरम्यान, याबाबत सातारा जिल्हा प्रशासनाची भूमिका समजू शकलेली नाही. या उपोषण आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून अनेक महिला संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी करत आहेत.

फोटो -सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या डॉ विजया जगताप