
(योगेश शर्मा पंढरपुर)–
पंढरपूर – येथील पेशवा युवा मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न झाला. यावेळी २५ बटुंवर उपनयन संस्कार करण्यात आले.
येथील आरती मंडप प्रांगण येथे आयोजिलेला हा व्रतबंध सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक बटूस मंचतर्फे सोवळे, उपरणे, पळी, पेला, ताम्हण व संध्येची पोथी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. मदन महाराज हरिदास होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील मंत्रालयातील राजपत्रित अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी व जयवंत शुगर, धाराशिवचे अध्यक्ष सि. एन. देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संस्कृती रक्षण करणे हे आजच्या काळात एक आव्हान होऊन बसले आहे. अशा काळात संस्कृती रक्षणाचे कार्यक्रम पेशवा युवा मंचच्या वतीने आयोजित करणे कौतुकास्पदच आहे असे गौरवोद्गार मंजुषा कुलकर्णी यांनी काढले.
मुंजीचे पौरोहित्य आकाश पारनेरकर व श्री विठ्ठल रुक्मिणी वेदपाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी बटूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, मनसे नेते दिलीप धोत्रे, रतनचंद शहा बँकेच्या शाखाधिकारी माधुरी बडवे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.ऋजुता उत्पात, श्री केटर्सच्या मंजिरी परिचारक, रेणुका प्रतिष्ठानच्या संस्थापिका प्रियंका देशपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी स्वा.सावरकर पथावरून बटूंची सवाद्य भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष ज्ञानराज बेणारे, उपाध्यक्ष मंगेश कवडे यांसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.