प्रा. डॉ. राहुल पालके यांना इंग्रजी विषयासाठी सोलापूर विद्यापीठाची संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता प्राप्त
बार्शी: प्रतिनिधी
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्रा.डॉ.राहुल भगवान पालके यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरची संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. राहुल पालके यांनी इक्सप्लोरिंग द सोशिओ-कल्चरल ॲण्ड हिस्टॉरिकल ॲसपेक्टस इन द सिलेक्ट ऑफ अमिताव घोष या विषयावर पीएच.डी. पदवी प्रा.डॉ. हनुमंत आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केली होती. गेली १० वर्षे ते इंग्रजी विषयाचे पदवी व पदव्युतर वर्गासाठी अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांची प्रसार भारती आकाशवाणी सोलापूर व धाराशिवमार्फत सेट व नेट परीक्षासंबंधी मार्गदर्शनपर मुलाखत संपन्न झाली होती. त्यांनी नेट-सेट व एमपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. त्यांना साहित्य लेखनासाठी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचे पुरस्कार मिळाले आहेत.त्यांचे विविध विषयावर संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी विविध विषयावर व्याख्याने संपन्न झाली आहेत. त्यांना साहित्याबद्दल विशेष रुची असून त्यांचे ३ काव्यसंग्रह तसेच कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनावरील काव्यसंग्रह व समीक्षात्मक चरित्रग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेले आहे. त्यांच्या शैक्षणिक संपादनासाठी त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
याप्रसंगी डॉ. पालके म्हणाले,
इंग्रजी साहित्याची मनस्वी आवड होती. त्यामुळेच पदवीला विशेष विषय घेवून साहित्याची ओळख करून घेतली. पदव्युतर कक्षेत इंग्रजी साहित्याचा आवाका लक्षात येवू लागला. कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षाकार,निबंधकार यांचे लेखन मनात घर करू लागले. ब्रिटिश साहित्याबरोबर अमेरिकन, आफ्रिकन, भारतीय साहित्यात विशेष रुची वाढत गेली. भाषाविज्ञान या विषयाची सखोलता जाणण्याची इच्छा निर्माण झाली. लेखकांचे विचार वहीत लिहिणे अप्रूप वाटत असे. अमिताव घोष यांचे लेखन व विचार आवडू लागले. इंग्रजी व्याकरणाची आवड वाढतच होती. नेट-सेट परीक्षांसाठी हे सर्व घटक अनुकूल ठरले. नोकरी लागली. साहित्यातून आणखी व्यक्तिमत्त्व समृद्ध व्हावे यासाठी पीएच.डी.पूर्ण केली. हा अनुभव दिव्यच होता. आज पीएच. डी. प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रिसर्च गाईड म्हणून पत्र मिळाले. शैक्षणिक व संशोधन कार्यातून इंग्रजी भाषा व साहित्य याचे ज्ञान व महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. नवनिर्मितीचा वेध व नाविन्याचा शोध घेण्यास नक्कीच संधी मिळेल.
त्यांच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, उपाध्यक्ष श्री. नंदनजी जगदाळे, सचिव श्री. पी.टी. पाटील, सहसचिव श्री.ए.पी.देबडवार, खजिनदार श्री.जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ. ए.बी.शेख, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. समाधान पवार, प्राचार्य डॉ. अशोक कदम, डॉ. अनिल कट्टे, डॉ. कल्याण साठे, डॉ. सदाशिव माने, डॉ. सोमनाथ यादव, डॉ.अशोक अनमुलवार सहकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
