Advertisement

उत्तम योजनांचा फक्त गाजावाजा; बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची फसवणूक

Spread the love


मुरुम, ता. उमरगा, ता. १६ (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ देण्यासाठी अनेक चांगल्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. रहिवाशी दाखले, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड, सात-बारा उतारे, फेरफार नोंदी, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी विविध सवलती या सर्व योजना समाजहिताच्या आणि खरंच उपयुक्त आहेत. परंतु या चांगल्या योजनांच्या अंमलबजावणीत मुरुम येथील प्रशासनाने अक्षरशः नागरिकांची थट्टा केली आहे. शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित शिबिरात बुधवारी (ता. १६) रोजी नायब तहसीलदार भीमाशंकर बेरूळे, मंडळ अधिकारी सुहास जेवळीकर, मुरुम मंडळ अधिकारी वैजनाथ माटे, तलाठी सुरेश खरात आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्कार, भाषणे आणि फोटोसेशनवर भर दिला गेला. नागरिकांनी मोठ्या आशेने गर्दी केली होती, मात्र प्रत्यक्षात फक्त आधार सीडिंग या एका कामापुरतेच शिबिर मर्यादित राहिले. तेही केवळ अर्ध्या तासात तांत्रिक अडचणी सांगून बंद करण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करून केवळ एका तासात शिबिर संपल्याची घोषणा करण्यात आली आणि नागरिकांना अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अनेक नागरिकांचे अर्ज, दाखले, फेरफार नोंदी आणि इतर तक्रारी हाताळल्या देखील गेल्या नाहीत. उपस्थित पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सर्व काही व्यर्थ ठरले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या सगळ्यावर तहसीलदारांना कोणतीच माहिती नसल्याचे समजले आणि कार्यक्रमाबाबत मोघम उत्तरे देऊन जबाबदारी झटकली. नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, जर योजना राबवायच्या नसतील, तर अशा शिबिरांमुळे आम्ही का फसावयाचे ? काहींनी प्रशासनाच्या फोटोसेशनवर प्रश्न उपस्थित केला. हे फोटो केवळ कागदावर यश दाखवण्यासाठी वापरणार का ? यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. तहसीलदार व संबंधित अधिकारी आता हे शिबिर योग्य नियोजन करून, पारदर्शकतेने पुन्हा राबवतील का ? की यावरही पडदा टाकून, गप्प बसतील ? या ढोंगी अंमलबजावणीमुळे शासनाच्या उत्तम योजनांवर लोकांचा विश्वास उडत चालला आहे, हे दुर्दैवी वास्तव ! आता तरी प्रशासनाला जाग येईल का, की पुन्हा एकदा नागरिकांना फसवण्याचा कट रचला जाणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!