
म्हसवड…प्रतिनिधी
छोट्या पडद्यावर अनेक मालिकेमध्ये नावलौकिक मिळवलेल्या माण तालुक्यातील देवापूर गावची सुकन्या विजया उर्फ बयो आनंदा बाबर हिचा नुकताच म्हसवड येथे सत्कार करण्यात आला.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे संस्थेच्या सचिव मुख्याध्यापिका सुलोचना विश्वंभर बाबर यांचे हस्ते टीव्हीवरील अनेक मालिकेत नावलौकिक मिळविलेल्या विजया आनंद बाबर या सिनेतारिकेचा सत्कार नुकताच क्रांतिवीर शैक्षणिक संकुल येथे करण्यात आला. विजया बाबर यांचे वडील आनंदा बाबर व कुटुंबीयांचा सत्कार संस्थाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना सिनेतारिका विजया बाबर म्हणाली जीवनात उच्च ध्येय ठेवा. त्याला प्रयत्नाची जोड द्या. जिद्दीने संघर्ष केल्यास यश तुमचेच असेल. यापुढील कालावधीत कलाक्षेत्राला मोठा वाव असून ग्रामीण भागातील अनेक मान्यवरांनी या क्षेत्रात नाव कमविल्याचे तिने सांगितले. हम भी कुछ कम नही हे दाखवून देण्याची उर्मी ग्रामीण कलाकारांमध्ये असल्याचे तिने सांगितले. आई वडिलांची प्रेरणा तसेच गुरुजनाच्या मार्गदर्शनामुळे आपण यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत असल्याचे विजया ने सांगितले. स्वामी समर्थ तसेच छोट्या बयो ची मोठी स्वप्ने या मालिकेने आपल्याला सामान्य रसिकांच्या घराघरात पोहोचवल्याचे सांगून क्रांतिवीर संकुलाच्या सर्वांगीण प्रगती बद्दल विजया बाबर हिने समाधान व्यक्त केले.
प्रा. विश्वंभर बाबर यांनी प्रस्ताविक करून विजया बाबर हिच्या सिने कलाक्षेत्रातील कार्याचा गौरव केला.
यावेळी प्राचार्य विन्सेंट जॉन , कौस्तुभ बाबर व सौ बाबर , तसेच सिनेतारिका विजया बाबर हिचे कुटुंबीय उपस्थित होते.
सिने तारिका विजया बाबर उर्फ बयो चा क्रांतिवीर संकुलात सन्मान.
