
(अजित जगताप)
मल्हार पेठ दि: सध्या सातारा जिल्ह्यातील पाटणचे सुपुत्र व शिवसेना नेते पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या हाती संपूर्ण कारभार आहे. त्यामुळे पाटणवासीयांना सत्तेची चव चाखण्यास मिळत आहे ही वस्तुस्थिती आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पाटण मधील शेतकरी सध्या गव्याच्या दहशतीमुळे हातबल झाल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत उपाययोजना न झाल्यास साताऱ्यातील कोयना दौलत बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी दिला आहे.
कोयना धरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. वाडवडिलांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करून सुद्धा आजही कोयना धरणग्रस्तांना न्यायासाठी आंदोलन करावी लागत आहे. आता उरल्या सुरल्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी आंदोलनाची वेळ आलेली आहे.
सध्या उन्हाळ्याच्या मौसम मध्ये कलिंगडाला खूप मोठी मागणी असतानाच रानगवा यांनी पाटण तालुक्यातील नदीकाठ व डोंगराळ भागातील कलिंगड, भुईमूग व भात शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. एका बाजूला वनविभागाच्या जाचक अटी व नियमामुळे शेतकऱ्यांना शेती अडचणीत असताना दुसऱ्या बाजूला जंगली जनावरांच्या त्रासामुळे स्थानिक शेतकरी शेती करणे विसरले आहेत. उदरनिर्वाहासाठी कराड, सातारा आणि पुण्या मुंबईकडे धाव घेत आहे. जे शेतकरी गावचा ओढा असल्यामुळे शेतीसाठी थांबलेले आहेत. त्यांना नागरी सुविधांबाबत पुनर्वसन विभाग, वन विभाग व कृषी विभागाने वाऱ्यावर सोडले आहे . पवनचक्कीची पाती आता थांबली असली तरी शेतकऱ्यांवरील अन्याय मात्र थांबला नाही. त्यांची अवस्था आदिवासी पाड्यासारखी झालेली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व पर्यटन वाढीसाठी जल पर्यटन आवश्यक आहे परंतु ,जंगल वाचवा पण त्यापूर्वी माणसं वाचवण्यासाठी आता काटेकोर नियम करण्याची गरज निर्माण झालेली आहे. अशा शब्दात शेतकरी व पुनर्वसनासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे चैतन्य दळवी, सुनील सावंत, विठ्ठल सावंत, सूर्यकांत पाटणकर यांनी व्यथा मांडली आहे .
सध्या पाटण तालुक्यातील शिरळ, दिंडोशी, मणेरी या गावचे शेतकरी शेतीतील पिकांवरील गव्यांच्या रात्रीच्या हल्ल्यामुळे हातबल झालेले आहेत. त्यांना दिलासा देण्याची भूमिका राज्य शासनाने ठेवावी. कारण, पाटणचे सुपुत्र व पालकमंत्री शंभूराजे देसाई हे वजनदार मंत्री म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने पाटणच्या विकासाला गती मिळाली आहे. डोंगरी महोत्सव व महाबळेश्वर महोत्सव आयोजन केले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबतही त्यांनी लक्ष घालावे. अशी मागणी शेतकरी संघटनेचे शंकरराव गोडसे, अमित यादव, प्रशांत पाटील, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब चव्हाण यांनी केली आहे. रानगव्यांना गवत व खाद्य उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतावर झुंडीने येऊन ताव मारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्याची महायुती शासनाची भूमिका आहे. पण शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे संरक्षण करण्याची भूमिका नसल्याची टीका होऊ लागलेली आहे.