
औंध प्रतिनिधी:- ओंकार इंगळे
औंधसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंधच्या उत्तरेकडील डोंगरावरील जोतिबाच्या यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी आणि शनिवार दि 12 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता येथील कुंभारवाडयातून जोतिबाच्या उत्सवमूर्तीची पालखीतून मिरवणूक (छबिना) काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक वाद्यवृंदाच्या गजरात गावातील श्रीयमाईदेवी मंदिर,होळीचा टेक,मारूती मंदिर ,बालविकास मंदिर,हायस्कूल चौकमार्गे जोतिबा डोंगरावर नेली जाणार आहे. शनिवारी पहाटे पाच ते सहा यावेळेत मुर्तीचे पारंपरिक पद्धतीने पूजन ,अभिषेक,महाआरती आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी वरूड येथील ब्राम्हणवृंद पौरोहित्य पठन करणार आहे.
त्यानंतर दुपारी दोन वाजता जोतिबा डोंगरावर उत्सवमूर्तीचे पूजन करुन छबिना व मंदिरास पाच पालखी प्रदक्षिणा घातल्या जाणार आहेत. भाविक जोतिबाचे नावाने चांगभलंचा जयघोष करून गुलाल खोबऱ्याची उधळण करतात.यावेळी औधसह जायगाव,भोसरे,कोकराळे,लोणी,अंभेरी व अन्य गावातील मानाच्या सासनकाठया नाचवतात. हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पालखीतून पुन्हा जोतिबाची उत्सवमूर्ती वाद्यवृंदाच्या गजरात गावात आणून कुंभारवाडयातील मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे तरी यासोहळयाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन कुंभार समाज व औंध ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.