शिरताव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतला आदर्श निर्णय,दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पत्नीला घेतले कामावर

Spread the love

म्हसवड- (सुशिल त्रिगुणे):
सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत, शिरताव येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत तसेच गावातील दानशूर व्यक्तींनी स्वर्गीय रणजीत चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचे वाटप केले. तसेच त्यांच्या पत्नीला ग्रामपंचायत शिरताव येथे शिपाई म्हणून नोकरी देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

स्व. रणजीत चव्हाण हे शिरताव ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत होते. ते स्वभावाने अत्यंत मनमिळावू, प्रामाणिक आणि सेवाभावी होते. ग्रामस्थांच्या दैनंदिन कामात नेहमी तत्परतेने सहकार्य करणारे म्हणून ते ओळखले जात. गत महिन्यात, ग्रामपंचायतीच्या जलपुरवठा कामानिमित्त कर्तव्यावर असताना विषारी वायू गळतीमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अचानक झालेल्या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबावर संकटाचे काळे ढग दाटले.

रणजीत चव्हाण यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुलांचा आधार हरपला. त्यांच्या मदतीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत सामाजिक भावनेतून “शिरताव ग्रामविकास” नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आणि त्यास ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच बाहेरगावातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संकलित निधीमधून ₹१,२९,५०० इतकी रक्कम स्व. रणजीत चव्हाण यांच्या कुटुंबीयांना सरपंच हनुमंत हरी विरकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी ग्रामस्थांनी एकमुखाने सांगितले की — “रणजीत चव्हाण यांची सेवा आणि कर्तव्यनिष्ठा विसरणे अशक्य आहे. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!