हजरत दर्गा संदल व नवरात्री मिरवणुकीची अभूतपूर्व भेट ; एकीचे दुर्मिळ दर्शन
सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या प्रयत्नांना यश – गावात धार्मिक ऐक्याचा नवा अध्याय
पिंपोडे बुद्रुक : अभिजीत लेंभे:

बनवडी (ता. कोरेगाव) गावाच्या इतिहासात कधीही न घडलेला अभूतपूर्व प्रसंग शुक्रवारी बनवडी येथे अनुभवायला मिळाला. हजरत पीर दस्तगीर दर्ग्याची संदल मिरवणूक आणि बनवडी सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाची मिरवणूक यांची ऐतिहासिक भेट घडून आली. या दुर्मिळ संगमाचे श्रेय पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराला जाते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या समन्वयातून व प्रयत्नातून दोन वेगळ्या धार्मिक परंपरांच्या मिरवणुका एकत्र आल्या आणि बंधुता, ऐक्य व सौहार्दाचे दर्शन घडले. गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या घटनेला उत्साहाचे स्वरूप दिले.
ज्येष्ठ नागरिकांच्या मते, यापूर्वी बनवडीच्या इतिहासात असे दृश्य कधीही पाहायला मिळाले नव्हते. दोन्ही समाज एकत्र आल्यामुळे गावात सामाजिक ऐक्याचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ही घटना फक्त बनवडीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण परिसरात धार्मिक सौहार्द व सामाजिक सलोख्याचा संदेश पसरवणारी ठरली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे गावात शांतता, बंधुता आणि मैत्रीचे नवे बीज रुजले आहे.
गावकऱ्यांनी एकमुखाने पोलिस प्रशासनाचे आभार मानले असून, “हेच खरे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे,” अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.