घिगेवाडीत गिरवले विद्यार्थ्यांनी व्यवहार ज्ञानाचे धडे. जिल्हा परिषद शाळेच्या स्तुत्य उपक्रमामुळे कौतुकांचा वर्षाव.

Spread the love

पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी/ अभिजीत लेंभे

घिगेवाडी ता. कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेने मुलांच्या व्यवहार ज्ञानात व बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी यासाठी शाळेच्या पटांगणात भरवला चिमुकल्यांचा बाल बाजार.
अश्या या आगळ्यावेगळ्या चिमुकल्यांच्या बाल बाजाराचे उद्घाटन शालेय कमिटी अध्यक्ष रोहित सावंत यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शालेय जीवनापासून मुलांना व्यवहारज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेला “फुड फेस्टिव्हल-भाजी मंडई ” हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थी हा केवळ अभ्यासात नव्हे तर व्यवहारात सुद्धा हुशार असणे गरजेचे आहे. या चिमुकल्यांच्या बाल बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या,चायनीज भेळ, ईडली,मंचुरियन,विविध प्रकारच्या डाळी,घरगुती बनवले जाणारे गोड पदार्थ,खाद्यपदार्थांमध्ये पॅटीस,भेल सेंटर,वडापाव,पाणीपुरी,भजी-चहा,अशा दुकानांचा यात समावेश होता. बाल बाजारात ग्रामस्थ, पालक महिला बचत गटाच्या सदस्य यांनी मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत विविध खाद्यपदार्थांची तसेच पालेभाज्यांची खरेदी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्यामुळे पालक वर्गातून हे समाधान व्यक्त होत होते.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान कळते आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवयास मिळतात. गणिती क्रिया स्वतः करता येते त्यामुळे स्वावलंबन व बुद्धिस चालना मिळते तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे ते अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहते. अशा प्रतिक्रिया खरेदीस आलेल्या पालक वर्गातून येत होत्या. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी घिगेवाडीचे आदर्श सरपंच नारायण सावंत, शिक्षिका सारिका ननावरे,सुधीर सावंत अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन,आदिनाथ सावंत यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने भरवलेल्या बाल बाजाराबाबत मनोगतं व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक संजय काळे सरांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाचे सदस्य, शालेय कमिटी सदस्य, ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

फोटो ओळ :- घिगेवाडी ता. कोरेगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भरवलेल्या बालबाजारात खरेदीसाठी आलेल्या महिला व ग्रामस्थांची गर्दी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!