म्हसवड वार्ताहर
माण तालुक्यातील पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः धुळदेव व खडकी परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा महिला आघाडीच्या उपजिल्हा अध्यक्षा सौ. सुवर्णा साखरे यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाबरोबरच यापूर्वी झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मका, बाजरी, ज्वारी आदी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे हजारो रुपयांचा खर्च करून उभी केलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याचबरोबर सततच्या पावसामुळे विहिरींच्या कडा ढासळल्या असून काही ठिकाणी शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था कोलमडून पडली आहे.
स्वतः सौ. सुवर्णा साखरे यांच्या लोखंडेवस्ती, मासाळवाडी शिवारातील शेतातही पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “शेतकऱ्यांचे हाल अत्यंत दयनीय झाले आहेत. शासनाने केवळ पाहणी करून थांबू नये, तर तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश द्यावेत. अन्यथा शेतकरी वर्ग कर्जबाजारीपणात अडकून आणखी संकटात सापडेल.”
शेतकरी वर्गाने प्रशासनाकडे सतत पंचनाम्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतेच माण तालुक्यातील म्हसवड शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी म्हसवड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि तातडीने आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल.


शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची वाट पाहत असताना पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने त्वरीत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
