कोरेगाव तालुक्यात बुधवारपासून महसूल सेवा पंधरवडा; गांधी जयंतीपर्यंत विविध समस्या सोडविण्यावर राहणार भर; जनतेला प्रत्यक्ष लाभ देण्याचे प्रयत्न : तहसीलदार डॉ. संगमेश कोडे
पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी
अभिजीत लेंभे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दि. २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण कोरेगाव तालुक्यात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी सोमवारी दुपारी चार वाजता दिली.
सेवा पंधरवड्याची सुरुवात दि. १७ सप्टेंबर रोजी होणार असून, त्याची पूर्वतयारी म्हणून सर्व गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलिस पाटील, विकास सोसायटीचे सचिव यांच्यासह शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे.
भूमी अभिलेख विभागाकडूनही वादग्रस्त रस्त्यांचे सीमांकन करून सर्व रस्ते नकाशात दर्शवून अभिलेखात त्यांची नोंद घेण्यात येणार आहे. याबाबत स्थानिक स्तरावर सर्व लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे. शिवार फेरी दरम्यान विविध रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे. सोबतच ई-पीक पाहणी व ॲग्रीस्टॅक नोंदणी केली जाणार आहे, असे डॉ. कोडे यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात ता. २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत ग्रामविकास विभागाने सर्वेक्षण करून अंतिम केलेल्या व नियमाप्रमाणे देय असलेल्या व्यक्तींना जागेचे पट्टे दिले जाणार असून, संबंधितांचे अतिक्रमण नियमानुकूल केले जाणार आहे.
याचा लाभ अनेक बेघर लोकांना होणार आहे. महसूल, ग्रामविकास, कृषी, भूमी अभिलेख, पोलिस विभाग व इतर कार्यालयांच्या सहकायनि मोहीम यशस्वी करणार असल्याचे तहसीलदार डॉ. कोडे यांनी स्पष्ट केले.