औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे
औंधमधील जुने स्टॅण्ड बाजार पटांगणाजवळील ऐतिहासिक विहीर, जी औंध संस्थान काळापासून अस्तित्वात आहे, तिचा ताबा सुरुवातीला शासनाकडे होता. नंतर हा ताबा औंध ग्रामपंचायतीकडे देण्यात आला. गावातील अर्ध्या लोकांना पाणीपुरवठा करणारी ही विहीर आज पूर्णपणे दूषित झाली असून, पिण्यायोग्य असलेले पाणी ग्रामपंचायतीच्या बेपर्वाईमुळे खराब झाल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
औंधमध्ये अलीकडच्या काळात कचऱ्याचा प्रश्न डोक्यावर बसला आहे. कचरा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे गावात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच दूषित पाणी आणि कचऱ्याचा थर यामुळे साथीचे रोग फैलावत आहेत. गावकऱ्यांच्या आरोग्याशी असा बेजबाबदार खेळ होत असताना ग्रामपंचायतीने डोळे झाकल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
यावर कठोर इशारा देताना मेजर धनाजी आमले म्हणाले –
“लवकरात लवकर विहिरीची स्वच्छता करून पाण्याचा प्रश्न सोडवा. अन्यथा औंध जनता रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन उभे राहील. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. जर याकडे दुर्लक्ष केले, तर एक सैनिक काय असतो हे दाखवून देऊ,” असा कडक इशारा त्यांनी दिला.